कानपूर : काँग्रेसचे कानपूरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे शुक्रवार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी निधन झाले. तब्येत बिघडल्यामुळे त्यांना कानपूरच्या कार्डिओलॉजी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
श्रीप्रकाश जयस्वाल यांना रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता, असे कानपूरच्या कार्डिओलॉजी रुग्णालयाचे हृदयरोग संचालक डॉ. राकेश वर्मा यांनी सांगितले. कानपूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर श्रीप्रकाश जयस्वाल तीन वेळा खासदार झाले होते. ते उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते होते. त्यांनी यूपीए सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आणि नंतर कोळसा मंत्री म्हणून काम केले. त्यांच्या शांत वर्तनामुळे,उत्तम जनसंपर्कामुळे आणि स्वच्छ प्रतिमेमुळे सर्वपक्षीय त्यांचा आदर करत होते. कानपूरमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या निधनाने कानपूर काँग्रेसचे कधीही भरुन येणार नाही असे नुकसान झाले आहे.