इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
निर्मला गावित नातवाला घेऊन घराबाहेर फिरत होत्या. पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
निर्मला गावित यांची अपघातावर आली पहिली प्रतिक्रिया
लोकांच्या आशीर्वादामुळे एवढ्या मोठ्या अपघातातून वाचले आहे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लवकर बरी होऊन पुन्हा सामान्य जीवन जगू शकेन, असा विश्वास निर्मला गावित यांनी व्यक्त केला. अपघात त्यावेळी नेमके काय झाले ते व्यवस्थित समजले नाही. मी नातवासोबत वॉक करायला निघाले होते. अचानक मागून जोरात आवाज आला. क्षणार्धात मी कारच्या बोनेटवर होते. नंतर थेट हॉस्पिटलमध्येच आल्याचे आठवते, मधले काही आठवत नाही; असे माजी आमदार निर्मला गावित यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. नातू बाजूला होता. अपघातात त्याला काहीही झालेले नाही. तो सुखरुप आणि सुरक्षित असल्याचे कळल्यामुळे आता रिलॅक्स आहे, असेही माजी आमदार निर्मला गावित म्हणाल्या. अपघात झाला त्यानंतर खूप वेदना होत होत्या. पण वेळेत उपचार सुरू झाले आहेत. यामुळे आता प्रकृती स्थिर आहे. बरं वाटत आहे. पण आणखी काही दिवस उपचार घ्यावेच लागतील. पूर्ण बरी हिंडण्याफिरण्यास वेळ लागेल, असे वाटते; अशा स्वरुपाची प्रतिक्रिया माजी आमदार निर्मला गावित यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.