मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील युवकांना आश्वासन
मुंबई : आम्ही मुंबई लोकलचे सगळे डबे वातानुकूलित करत आहोत. या लोकलचे सर्व दरवाजे आपोआप बंद होतील. त्यामुळे कोणीही लोंबकळत प्रवास करू शकणार नाही. मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की, आम्ही मेट्रोइतकीच सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार आहोत. मात्र, ते करत असताना द्वितीय श्रेणी डब्याचे तिकीट एक रुपयानेही वाढवणार नाही. आताचा जो तिकीट दर आहे, त्याच दराने आम्ही मुंबईकरांना वातानुकूलित ट्रेनचे तिकीट देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रेल्वेमध्ये गर्दीची समस्या असून प्रवासी रेल्वेच्या दरवाजात उभे राहून लोंबकळत प्रवास करतात. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट होणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
वॉटर टॅक्सीचे जाळे तयार करणार
फडणवीस पुढे म्हणाले, ‘आम्ही मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा देखील सुरू करत आहोत. मुंबई-अलिबाग रो-रोच्या धर्तीवर मुंबईत वॉटर टॅक्सी सुरू होतील. वॉटर टॅक्सीचे मोठे जाळे तयार केले जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी वॉटर टॅक्सीने गेट वे ऑफ इंडियाला जाऊ शकतात.’
लोकलमधून दररोज ९० लाख लोकांचा प्रवास
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबई उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. दररोज ९० लाख लोक या लोकलने प्रवास करतात; परंतु लोकलमध्ये इतकी गर्दी असते की खरा मुंबईकरच या रेल्वेने प्रवास करू शकतो. बाहेरचा माणूस या लोकल ट्रेनमध्ये प्रवेश सुद्धा करू शकत नाही. या लोकलचा विकास करणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की, सुंदर अशी मेट्रो मुंबईकरांना दिल्यानंतर आता लोकल रेल्वेचा कायापालट करणं आवश्यक आहे.’