नाशिक: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून येत्या २ डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष प्रचार करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार मतदान तोंडावर असताना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका प्रचार सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.
बारामती तालुक्यातील मालेगाव नगर पंचायत निवडणुकीमध्ये पक्षाचा प्रचार करताना अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करताना, 'तुमच्याकडे मत आहे, तर माझ्याकडे निधी आहे' असे विधान केले. पुढे जर तुम्ही पक्षाचे सर्व उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला शब्द देतो, शहराला निधीची कमतरता भासू देणार नाही. जर तुम्ही आपल्या पक्षाचे सर्व उमेदवार विजयी केले तर मी सर्व आश्वासने पूर्ण करेल. पण जर निवडून आले नाहीत तर मी पण विचार करेन असे अजित पवार यांनी म्हटले आहे. या भागात पवारांनी १८ उमेदवार उभे केले आहेत.
मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये प्री नॉन-इंटरलॉकिंग अणि नॉन-इंटरलॉकिंग ...
दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर शिउबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सरकारला जो पैसा मिळतो तो जनतेच्या टॅक्समधून मिळतो, हा पैसा अजित पवार यांच्या घरातून येत नाही. अजित पवार यांचं हे वक्तव्य म्हणजे मतदारांना धमकावण्याचा प्रकार आहे, हे लोकशाही विरोधात आहे, निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार? असा थेट सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
अजित पवार आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. जानेवारी २०२५ मध्ये, बारामती या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात एका जाहीर सभेला संबोधित करताना सुद्धा केलेले त्यांचे विधान चर्चेत होते. "तुम्ही मला मतदान केले आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझे मालक आहात," या विधानावरून अजित पवारांवर टीका होतं होती. आता परत त्यांनी मतदारांना आवाहन करताना केलेले विधान चर्चेत आहे.