बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ आणि लोकप्रिय सुपरस्टार, 'ही-मॅन' (He-Man) म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे आज वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. सिनेसृष्टीतील या 'हँडसम हंक'ने अखेर जगाचा कायमचा निरोप घेतल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर आणि त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते. तब्येत अधिक खालावल्यामुळे त्यांना साधारणतः १२ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती अधिक नाजूक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता आणि ते घरीच विश्रांती घेत होते. मात्र, अखेर त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. तब्बल सहा दशके आपल्या दमदार अभिनयाने आणि हँडसम लूकने भारतीय सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या या 'कोहिनूर' कलाकाराच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी आणि न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीमुळे अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडाले आहे आणि विविध कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा बनला बॉलिवूडचा 'ही-मॅन' सुपरस्टार
एका सर्वसामान्य पंजाबी कुटुंबातून आलेल्या मुलाने इंडस्ट्रीचा 'ही-मॅन' हा किताब कसा मिळवला, हे जाणून घेणे रंजक आहे. फार कमी लोकांना माहिती असेल की, सिनेसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांचे मूळ नाव केवल कृष्ण देओल होते. पण, चित्रपटांमध्ये त्यांची ओळख धर्मेंद्र या नावानेच झाली. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. त्यांचे बालपण एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात व्यतीत झाले. त्यांचे वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो हे होते. धर्मेंद्र यांनी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य सहनेवाल गावात घालवले. त्यांचे शिक्षण लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत झाले. त्यांचे वडील गावातील याच शाळेचे मुख्याध्यापक होते. एका सामान्य घरातील आणि ग्रामीण भागातील मुलाने आपल्या कर्तृत्वाने आणि अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टीवर सहा दशके राज्य केले. त्यांच्या या प्रवासाने अनेक कलाकारांना प्रेरणा दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या शेवटच्या १२ दिवसांचा संघर्ष
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांच्या शेवटच्या १२ दिवसांमध्ये तब्येतीमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळाला.अचानक प्रकृती बिघडल्यामुळे धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर तब्बल १२ दिवस उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांच्या प्रकृतीला उपचारांनी चांगला प्रतिसाद मिळत होता, पण नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक झाली. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना आयसीयू (ICU) मधून व्हेंटिलेटरवर (Ventilator) हलवण्यात आले होते. काही काळानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने आणि देओल कुटुंबीयांनीही दिली. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरीच होते, मात्र अखेर त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सनी त्यांची भेट घेतली होती. सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल, रितेश देशमुख यांसारख्या मोठ्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन 'ही-मॅन' यांची भेट घेतली. भेटीनंतर रुग्णालयातून बाहेर पडताना सर्वच स्टार्सच्या डोळ्यांत अश्रू तराळलेले पाहायला मिळाले, ज्यामुळे धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची नाजूकता तेव्हाच स्पष्ट झाली होती.