जालना : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम वाढत असताना जालना जिल्ह्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांनी तब्बल १२ वर्षे असलेला अबोला संपवत पुन्हा हातमिळवणी केल्याचे चित्र दिसले. गेली चार दशके पक्षात एकत्र काम करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळापासून मतभेद होते. मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही एकत्र येऊन प्रचाराला वेग दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, “आमचा वाद हा वैयक्तिक नव्हता. कोणत्या कार्यकर्त्याला संधी द्यायची, कोणाला पद मिळावे यावरून मतभेद झाले होते. विरोधकांनी त्याचा फायदा घेतला, पण आता ते सर्व संपले आहे.”
ते पुढे म्हणाले, “भाजपला आम्ही उभं केलं, त्याला बळ दिलं. आता पुन्हा एकत्र येण्यात काहीही आश्चर्य नाही. पुढील निर्णय आम्ही दोघे मिळून घेणार आहोत. हा वाद कार्यकर्त्यांसाठी सुरू झाला आणि आता त्यांच्याच हितासाठी संपवला आहे.”
दानवे यांनी विरोधकांवर टोल लगावत म्हटले, “आम्ही एकत्र आल्याने काहींचा तोल जाईल. जुळू इच्छिणारे जुळतीलच. ही विचारांची लढाई आहे.”
ते पुढे म्हणाले की, ज्या काळात भाजप जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर होता, त्या काळात दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केले. “आज पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे आणि ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, आता कार्यकर्त्यांनीही एकत्र यावं,” असे आवाहन त्यांनी केले.
राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनीही एकजुटीचा संदेश दिला. ते म्हणाले, “जिल्ह्यात भाजप अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे घडवून आणली आहेत. आता पुढील विकास आणि पक्षाच्या बळकटीसाठी आम्ही एकत्र काम करणार आहोत.”