मुंबई : मुंबईतील वरळीमध्ये पंकजा मुंडे यांचा PA अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिने शनिवारी संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच परिसरात आणि राजकीय वर्तुळात तणाव निर्माण झाला.
गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचा विवाह फेब्रुवारी महिन्यात बीडमध्ये झाला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणे आणि मानसिक तणाव निर्माण झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गौरी पालवे केईएम रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होती. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ती रुग्णालयात होती आणि नंतर घरी आली. यानंतर संध्याकाळी तिने हे धक्कादायक पाऊल उचलले.
सुरुवातीला पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. परंतु गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्याने गौरीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर रविवारी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी अनंत गर्जे, त्याची बहीण शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १०८, ८५, ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे याचा आरोप आहे.
कुटुंबीयांच्या मते, सासरच्या मंडळींकडून सतत छळ होत होता. तसेच गौरीने पतीच्या मोबाईलमध्ये काही चॅटिंग पकडल्याचेही समोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे पालवे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.
गौरी पालवे गर्जेने आपला जीव दिला नसून तिची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात तणाव निर्माण झाला आहे.
सध्या अनंत गर्जे कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही. पोलिस आता या प्रकरणात अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध पुढील कारवाई काय करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.