भाईंदर : भाईंदर येथे सोन्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिराला कारखान्यात धारदार शस्त्राने ठार मारणाऱ्या पत्नीला आणि मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. भाईंदर पूर्वेकडील एस. व्ही. रोड येथील सोनल पार्क सोसायटीच्या दुकान नं. १ मध्ये ५१ वर्षीय सुशांतो अबोनी पॉल यांचा सोन्याचे दागिने तयार करण्याच्या कारखान्यात धारदार शस्त्राने हल्ला करून खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहा. पोलिस आयुक्त सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलीस ठाण्याचे व. पो. नि. धीरज कोळी यांनी तक्रारदार व गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरू केला. हत्येच्या आदल्या रात्री मयत सुशांतो पॉल यांच्या कारखान्यात त्यांची पत्नी अमृता सुशांतो पॉल व दोन मुले भांडण करत होते अशी माहिती मिळाली. त्याअानुषंगाने तपासाची दिशा ठरवून मयत यांची पत्नी अमृता सुशांतो पॉल व त्यांची दोन मुले यांचा शोध घेऊन गुन्हयाबाबत विचारपूस केली. तेव्हा त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. अमृता पॉल व मुलगा सुमित पॉल यांना पोलिसांनी अटक केली असुन बालकासही तपासकामी ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख करत आहेत.