मुंबई : मुंबईच्या लाखो चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी कामे आणि अत्यावश्यक दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक आणि रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याणदरम्यान अप (Up) आणि डाऊन (Down) जलद मार्गावर रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी १०:४० वाजल्यापासून ते दुपारी ३:४० वाजेपर्यंत, म्हणजेच पाच तासांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर (Slow Line) वळवण्यात येणार आहेत. यामुळे जलद लोकलच्या वेळेत बदल होणार असून, काही लोकल फेऱ्या रद्द देखील केल्या जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल मार्गावर (हार्बर लाईन) कोणताही ब्लॉक नसला तरी बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर आजपासून (२२ नोव्हेंबर) ते ३ डिसेंबरपर्यंत अभियांत्रिकी काम सुरू राहणार आहे. बदलापूर स्टेशन परिसरात मध्यरात्रीनंतर २ ते ३:३० वाजेपर्यंत स्टेशन परिसरात गर्डर उभारणीचे महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. बदलापूर स्टेशनवरील रात्रीच्या ब्लॉकमध्ये प्रवाशांची संख्या कमी असली तरी, लांब पल्ल्याच्या आणि शेवटच्या लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे महत्त्वाचे काम सुरु
प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन या परिसरात महत्त्वाच्या पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. बदलापूर स्थानक परिसरात हा पादचारी पूल उभा करण्यासाठी अभियांत्रिकी पातळीवर मोठे आणि महत्त्वाचे काम केले जाणार आहे. या कामामध्ये ३७.२ मीटर लांबीचे असे तब्बल १८ स्टील गर्डर उभारण्यात येणार आहेत. हे विशाल गर्डर सुरक्षितपणे आणि अचूकपणे बसवण्यासाठी ३५० मेट्रिक टन क्षमतेची विशेष क्रेन वापरली जाणार आहे. हे काम सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी शनिवार, २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते ३ डिसेंबरपर्यंत लोकल मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्यतः रात्री उशिरा ते पहाटेच्या वेळेत असणार आहे (मध्यरात्रीनंतर २ ते ३:३० पर्यंत), जेणेकरून दिवसा प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता येईल. या कामामुळे बदलापूर स्टेशनवर प्रवाशांसाठी आधुनिक आणि सुरक्षित पादचारी पूल उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांची सोय वाढेल. प्रवाशांनी या १२ दिवसांदरम्यान रात्रीच्या लोकलच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात आज, २२ नोव्हेंबर रोजी माहिम रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी आग लागल्याची गंभीर घटना घडली आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी ही ...
सीएसएमटीहून शेवटची कर्जत लोकल रात्री ११.३० वाजता
ब्लॉक कालावधीत मध्यरात्री १२.१२ वाजता सुटणारी कर्जत-सीएसएमटी (Karjat-CSMT) लोकल आता अंबरनाथपर्यंतच धावेल. म्हणजेच, ती कर्जत ते अंबरनाथ दरम्यान रद्द राहील. या बदलामुळे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हून कर्जतपर्यंत जाणारी शेवटची लोकल रात्री ११.३० वाजताची असणार आहे. कर्जतहून पहाटे २.३० वाजता सुटणारी लोकल आता कर्जत ऐवजी अंबरनाथ येथून पहाटे ३.१० वाजता सीएसएमटीसाठी रवाना होईल. ही लोकल देखील कर्जत ते अंबरनाथदरम्यान रद्द राहील. दोन्ही दिशांना म्हणजेच अप आणि डाऊन मार्गावर कर्जत ते अंबरनाथ दरम्यान मध्यरात्रीच्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कर्जत आणि अंबरनाथ दरम्यान रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलांची गांभीर्याने नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
कधीपर्यंत असेल विशेष रात्रकालीन ब्लॉक
मध्य रेल्वेने पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या बांधकामातील यांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी एक विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्याचे निश्चित केले आहे. या ब्लॉकमुळे अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. २१ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ पर्यंत, म्हणजेच तब्बल १२ दिवसांसाठी हा विशेष ब्लॉक असेल. हा ब्लॉक दररोज रात्री १:३० वाजल्यापासून ते पहाटे ३:३० वाजेपर्यंत या दोन तासांच्या कालावधीत घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे पनवेल आणि कळंबोलीदरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या मार्गिकांचा वापर पूर्णपणे बंद राहणार आहे, ३ प्लॅटफॉर्म अप आणि डाऊन मार्गिका, ट्रेन उभ्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अप आणि डाऊन मार्गिका, इंजिन वळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्गिका, रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या रात्रकालीन ब्लॉकमुळे २० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना त्यांच्या नियमित वेळेपेक्षा विलंब होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याने, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घरातून निघताना किंवा लोकल प्रवास करताना रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच निघावे, असे आवाहन केले आहे.