महिला रुग्ण हादरली, डॉक्टरही थक्क
कल्याण : कल्याणमध्ये अॅसिडिटीच्या त्रासासाठी दिलेल्या गोळ्यांमध्ये अळ्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराने सायली पनवेलकर या महिला रुग्णासह संबंधित डॉक्टरही हादरले आहेत. पनवेलकर अॅसिडिटीच्या उपचारासाठी डॉ. केदार भिडे यांच्याकडे उपचारासाठी आल्या होत्या. त्यांनी दिलेल्या औषधाच्या स्ट्रिपमधील एका गोळीमध्ये त्यांना अळ्या दिसल्या. असा प्रकार अन्य कोणासोबत होऊ नये यासाठी डॉक्टर भिडे यांनी तातडीने प्राईड हेल्थ केअरशी संपर्क साधला. या प्रकरणी गोळ्यांची कंपनी 'रोनपोली' यांच्याकडे संपर्क साधून घडला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला.
कल्याण, प. येथील प्रथमेश इमारती राहणाऱ्या सायली पनवेलकर यांचा खांदा दुखत होता. त्यांची मुलगी मानसी राणे यांच्यासह त्या डॉक्टर केदार यांच्याकडे उपचारासाठी गेल्या. डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या. त्या गोळ्यामध्ये अॅसिडिटीवर ओमे कैप-२० ही गोळी देखील होती. सायली यांनी गोळ्या खाण्यासाठी घेतल्या. तेव्हा त्या गोळ्या काळपट असल्याचे दिसून आले. गोळ्या अशा का दिसतात म्हणून त्यांना शंका आली. त्यांनी गोळ्या निरखून पाहिल्या. त्यावेळी त्यांना त्या गोळ्यात अळ्या दिसल्या. सायली आणि त्यांची मुलगी मानसी यांना गोळ्यांच्या पाकिटावर गोळ्यांची मॅन्युफॅक्चर डेट ही २०२५ सालची आढळली. त्या गोळ्यांची मुदत २०२७ सालपर्यंत असल्याचेही त्यावर नमूद करण्यात आले होते. मुदत संपलेली नसताना गोळ्या काळपट आणि त्यात अळ्या कशा आल्या असा प्रश्न त्यांना पडला. हा प्रकार एखाद्या रुग्णांच्या जिविताशी खेळण्याचा आहे. त्यामुळे गोळ्यांच्या कंपनीविरोधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मानसी यांनी
केली आहे. त्यांना अळ्या आढळून आलेल्या गोळ्या पाठवून द्या असे सांगितले गेले. जर कंपनीने दाद दिली नाही, तर या प्रकरणात ग्राहक न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल असे डॉक्टर भिडे यांनी सांगितले आहे.