पाचवा वेद : भालचंद्र कुबल
मागील दोन्ही लेखांमध्ये लेखकाइतकाच नाटकाचा दिग्दर्शकही उपेक्षितच राहतो. या विधानाबाबत उलट-सुलट चर्चा केली. काही दिग्दर्शकांची मते जाणून घेतली, काही संदर्भ वाचले, तर काही संदर्भ खोदून काढावे लागले. सांस्कृतिक संचालनालयाने मान. दिलिप शिंदे यांच्या संकल्पनेनुसार राज्यनाट्य स्पर्धेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सुवर्णरंग’ नावाचा एक डेटाबेस प्रकाशित केला आहे. ती माहिती या लेखांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. प्रत्येक नाट्यसमीक्षकाने पदरी बाळगावा असा तो डेटाबेस आहे. त्यातील काही मान्यवरांचे लेख तर दिग्दर्शन विषयावर सखोल भाष्य करणारे आहेत. बरेचसे लेख मी आणि माझे अनुभव या पलीकडचे जरी नसले तरी त्या काठावरून पलीकडचा तीर दिसू शकतो अशा योग्यतेचे निश्चित आहेत.! बऱ्याच दिग्दर्शकांनी आपण राज्यनाट्य स्पर्धेचे फाईंड आहोत अशी कबुलीही दिलेली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर काम करायला मिळणारी ऊर्जा, प्रोत्साहन आणि थोडंबहुत नाव या स्पर्धेत कार्यरत राहिल्यानेच मिळालं असा बऱ्याच जणांचा दावा आहे. विजया मेहता, राजा नातू, अशोक साठे, जब्बार पटेल, राम मुंगी, जयदेव हट्टंगडी, कुमार देशमुख, कुमार सोहोनी, सतीश पुळेकर, अजित भुरे, हेमू अधिकारी, रत्नाकर मतकरी आदी दिग्दर्शक व्यावसायिक रंगभूमीवर येण्यास कारणच राज्यनाट्य स्पर्धेतील त्यांचे एक नंबरी यश होते. नाट्यव्यवसाय व नाट्यस्पर्धा प्रयोगमूल्यांच्या क्षेत्रात एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. अतिशय अभिनव प्रकारची प्रयोगमूल्ये आजकाल प्राथमिक फेरीत जिल्ह्याच्या गावातून वा शहरातून येणाऱ्या नाटकातही दिसतात. बरेच नाट्यकर्मी प्रयोगाचा साचा बदलण्याचा प्रयत्नही करीत असतात. पुण्या-मुंबईकडे बॉक्स थिएटर, रुम थिएटर, थिएटर ऑफ रिलेव्हंस, पॉकेट थिएटरद्वारा प्रेरीत नाट्यचळवळीत जी नाटके स्वतंत्रपणे स्वतःचा ठसा उमटवू पाहत आहेत, त्यातील दिग्दर्शकीय योगदान डावलून चालणार नाही कारण दिग्दर्शनाच्या मूलभूत आधारतत्त्वावर त्यांचे सादरीकरण प्रयोगमूल्य अधोरेखित होताना आढळते. किरवंत, ठष्ट, झुंज, गटार, घाशीराम कोतवाल, कोण म्हणतं टक्का दिला, आदी बंडखोरी सिद्ध करणाऱ्या नाटकांमागे दिग्दर्शकांची बंडखोर मानसिकताच होती. परंतू आज पट्कन ठष्ट किंवा झुंज नाटकाचा दिग्दर्शक कोण? असा प्रश्न विचारल्यास कलाकार आठवतील पण दिग्दर्शक आठवावे लागतात. अर्थात ही उपेक्षा आपल्या पदरी पडेल किंवा पडणार नाही याची चिंता त्या बंडखोरीमागे कधीचीच लोप पावलेली असते. ‘नाट्यदिग्दर्शकांची बंडखोरी’ हा विषय अनेक अर्थांनी घेतला जाऊ शकतो, कारण नाट्यदिग्दर्शक हे अनेकदा नाटकाच्या परंपरेला आव्हान देऊन नवीन कल्पना मांडत असतात. उदाहरणार्थ, ऑर्सन वेल्ससारख्या दिग्दर्शकांनी नाटकांच्या पारंपरिक सादरीकरणाच्या पलीकडे जाऊन शेक्सपियरच्या नाटकांना नवीन आणि अनपेक्षित दृष्टिकोनातून सादर केले. अल्बर्ट कामूसारख्या लेखक-दिग्दर्शकांनी आपल्या नाटकांतून सामाजिक आणि नैतिक विचारांना आव्हान दिले, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये वादविवाद निर्माण झाले. काही नाट्यदिग्दर्शक नाटकाच्या पारंपरिक शैलीत बदल करून अभिनयात आणि सादरीकरणात बंडखोरी करतात. काही दिग्दर्शक आपल्या नाटकांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय विषयांवर भाष्य करतात आणि अशा प्रकारे ते परंपरेला आव्हान देतात. अल्बर्ट कामू सारख्या लेखक-दिग्दर्शकांनी त्यांच्या नाटकांतून अस्तित्ववादासारख्या विचारधारेला प्रोत्साहन दिले. जागतिक पातळीवर जर अशा विचारवंत आणि सैद्धांतिक मूल्ये बाळगणाऱ्या दिग्दर्शकांची दखल तुटपुंज्या अभ्यासकांनी घेतली, तर भारतीय आणि त्यातही केवळ मनोरंजनाच्या चष्म्यातून नाटक अभ्यासणाऱ्यांबद्दल तर न बोललेलेच बरे..! दिग्दर्शकाच्या उपेक्षिततेची कारणमीमांसा मनोरंजनाच्या मानसिकतेला डोक्यावर घेऊन नाचल्यानेच वाढीस लागते आणि मग तसेच रिझल्ट्स समोर येऊन उभे ठाकतात. वेगळेपणाचा अट्टाहासच दिग्दर्शकाला उपेक्षिततेच्या गर्तेत ढकलून देतो. आणि गंमत म्हणजे अशा नाट्यप्रक्रियेत माझी उपेक्षा झाली, हे मान्य करायला कुठलाच दिग्दर्शक तयार होत नाही. अभिनय करता करता तयार झालेल्या दिग्दर्शकांच्या वाट्याला मात्र ही उपेक्षा कधीच येत नाही. अभिनयामुळे मिळालेल्या फेसव्ह्यॅल्यूचा वापर दिग्दर्शकीय प्रक्रियेत झाल्याने त्यांची उपेक्षा शंकरपाळीत शंकर शोधल्यासारखी असते. विजया मेहता, अमोल पालेकर, मधुकर तोरडमल, सतीश आळेकर, विनय आपटे, सतीश पुळेकर, राजेश देशपांडे, हृषिकेश जोशी ही त्यापैकी काही प्रातिनिधिक नावे. एक मात्र निर्विवाद सत्य या नावांतून सिद्ध झालं ते म्हणजे याच दिग्दर्शकांमुळे नाटक माध्यमाच्या कक्षा रुंदावल्या आणि नाटक नावाचं माध्यम मोठं झालं. चेहरा असलेल्या या दिग्दर्शकांच्या वाट्याला जर अपयश (व्यावसायिक नव्हे, तर प्रोसेसमधली उपेक्षा) आलं असतं, तर मग मात्र मराठी नाटक ऐन तारुण्यात ओढगस्तीला लागलं असतं हे देखील तितकंच खरंय.
या संपूर्ण विवेचनात मुंबई-पुण्याव्यतिरिक्त अनेक असे दिग्दर्शक यशा-अपयशाची पर्वा न करता मराठी रंगभूमी नामक जगन्नाथाचा रथ ओढत असतात. जगन्नाथाच्या यात्रेमध्ये नाचणारा नाचत असतो, मिरवणारा मिरवत असतो, पुजारी पुजत असतो, कमावणारा कमवत असतो; परंतु रथ ओढणाऱ्यास त्याची कल्पना असून सुद्धा रथ ओढतच असतो. दिग्दर्शकामध्ये आणि या रथ ओढणाऱ्यांमध्ये किंचितही वेगळेपण नाही. अरुण मेहता, सुबोध पंडे, हरिश इथापे, डॉ. शरद भुताडीया, योगेश सोमण, विवेक गरुड, शाम शिंदे, रविंद्र लाखे, पद्मनाभ पाठक, सुहास भोळे, आनंद खारबस, डॉ. जयश्री गावंडे, अनघा देशपांडे, शोभा बोल्ली, प्रदीप वैद्य, अमेय दक्षिणदास, श्रीराम जोग, सलीम शेख आणि शेकडो तरुण रंगकर्मी हा रंगरथ गेली कित्येक वर्षे ओढत आहेत. जय पराजय, ना मोठेपणाचा हव्यास आणि तरीही उपेक्षेचा लवलेश न बाळगणारा हा रंगकर्मी नाटक सदैव घडवत ठेवतो आहे, नाटक घडवत राहील...!
(सर्व छायाचित्रे प्रातिनिधिक आहेत)