ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर ही अपघाताची दुर्घटना घडली. ज्यात एका भरधाव चारचाकीने अनेक वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की एकजण थेट ब्रिजच्यावरून खाली कोसळला. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी चालकाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. ही चारचाकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या महिला उमेदवार किरण चौबेंची होती. चारचाकीमधून त्या एका सभेसाठी जात असताना हा अपघात घडला असून जखमींमध्ये त्यांचाही समावेश आहे. तर मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये चारचाकी चालक आणि दुचाकींवरील तीन जण अशा चौघांचा समावेश आहे.
पोलिसांना दिलेल्या जबाबात किरण चौबे म्हणाल्या की, गाडी पुलावरून जात असताना चालक लक्ष्मण शिंदे यांना एक फोन आला. फोनवर बोलत असतानाच अचानक त्यांनी बोलणे थांबवले. यानंतर चौबेंना दिसले की, शिंदेंचा पाय अॅक्सिलरेटरवर जोरदार दाबला गेला आणि गाडी अनियंत्रित होऊन वेगाने पुढे जातच क्षणार्धातच अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात चारचाकी चालक लक्ष्मण शिंदे यांच्यासह दुचाकीवरील ४५ वर्षीय शैलेश जाधव आणि ५७ वर्षीय चंद्रकांत अनारके यांचा मृत्यू झाला. हे दोघेही जण अंबरनाथ महापालिका कर्मचारी आहेत. तर १७ वर्षीय सुमीत चेलानी यालाही अपघातात प्राण गमवावे लागले. संबंधित घटना पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे अपघाताचे तपशील समजण्यात मदत झाली. मात्र या व्हिडीओमुळे थरकाप उडाला आहे. या घटनेतील जखमींवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयातही उपचार सुरु असल्याची माहिती आहे.