मराठवाड्यात उमेदवारी अर्जांचा पाऊस

छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. २१ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. आता राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने, स्थानिक पातळीवर चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. विशेषतः अध्यक्षपदासाठी अनेक ठिकाणी इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे. २६ नोव्हेंबरला चिन्हे वाटप होतील. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत अनेक ठिकाणी राजकीय सोयीनुसार युतीधर्म पाळला जाणार नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. याचा अर्थ असा की, जे पक्ष किंवा गट एकत्र आहेत, ते स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधातही उभे राहू शकतात. यामुळे निवडणुकीचे निकाल अनपेक्षित लागू शकतात.


मराठवाड्यात असलेल्या आठ जिल्ह्यांतील ४८ नगर परिषदा आणि ११ नगरपंचायतींच्या नगरसेवक व अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली. नांदेड जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी २१२, तर नगरसेवक पदासाठी २१५३ जणांनी अर्ज दाखल केले. त्या पाठोपाठ बीड जिल्ह्यात १६९ व नगरसेवक पदासाठी २१२७, परभणी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ११७, तर नगरसेवक पदासाठी १२१० जणांनी, लातूर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी १०३ व नगरसेवक पदासाठी १२५७ जणांनी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ९४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदासाठी १४३६ अर्ज दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ७१ व नगरसेवक पदासाठी ९१० जणांचे अर्ज, धाराशिव जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ५३, तर नगरसेवक पदासाठी ६१० अर्ज तसेच सर्वात कमी जालना जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ४२ व नगरसेवक पदासाठी ४१८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अध्यक्षपदासाठी ७५० पेक्षा अधिक तर नगरसेवक पदासाठी तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले.


या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात विद्यमान व माजी आमदारांनी स्वतःच्या नातलगांना उमेदवारी अर्ज भरायला लावले. सत्ताधारी व विरोधी पक्षांतील नेत्यांच्या परिवारातील सदस्यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आपलेच सगे-सोयरे सत्तेवर राहावेत या उद्देशाने काँग्रेस, भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट तसेच एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी स्वतःच्या पाहुण्यांचा उमेदवारी अर्जात भरणा केलेला आहे. त्यामुळे भविष्यात याच परिवारांकडे सत्तेची सूत्र राहणार असल्याचे उमेदवारी अर्जांवरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे स्वतःचे चिरंजीव समीर सत्तार यांची उमेदवारी दाखल केली. याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील आमदगर संतोष बांगर, परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकर, नारायण कुचे यांनी स्वतःच्या नातलगांना व विशेषतः घरातील सदस्याला उमेदवारी दिली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजई गीता पवार यांनी भाजपकडून उमेदवारी दाखल केली, तर अंबाजोगाईमध्ये भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी शहर परिवर्तन जनविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात गेलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांची पत्नी डॉ. सारिका यांनी भाजपकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी तथा गंगाखेडचे माजी आमदार मधुसूधन केंद्रे यांची पत्नी उर्मिला यांनी गंगाखेडमध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. आता मराठवाड्यात उमेदवारी मागे घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या निवडणुकीच्या लढतीचे सर्व चित्र २५ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत कोण-कोण उमेदवारी मागे घेतो हे स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे.


राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तीन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. जिंतूर, सेलू व गंगाखेड या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची कसोटी पणाला लागली आहे. याव्यतिरिक्त पाथरी व पूर्णा या ठिकाणी बोर्डीकर यांना उमेदवार मिळालेला नाही. त्या ठिकाणी शिंदेसेना तसेच काँग्रेसचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तानाजी सावंत समर्थक विरुद्ध इतर सर्वजण परंडा व भूम येथे एकमेकांच्या विरुद्ध लढणार आहेत. या ठिकाणी नळदुर्ग, उमरगा येथे शरद पवार गटाचे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात थांबणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीची कसोटी पणाला लागलेली आहे. लातूर जिल्ह्यात पाच नगराध्यक्ष पदासाठी १०३ उमेदवार इच्छुक होते, तर नगरसेवकाच्या १२८ जागांसाठी १२५७ उमेदवारांनी अर्ज भरले. या जिल्ह्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे आमदार सुपुत्र काँग्रेसला किती ठिकाणी विजय मिळवून देणार याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात युती स्वतंत्र निवडणूक लढविणार आहे, तर आघाडी मात्र एकत्र राहून सोयीच्या ठिकाणी उमेदवार उभे करून सत्ता हातात घेण्याच्या तयारीत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तीन नगरपालिका कोणाच्या ताब्यात जातील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वसमत, कळमनुरी व हिंगोली या तीन नगरपालिकेसाठी निर्णायक निवडणूक होणार आहे. जालना जिल्ह्यातील परतुर, अंबड व भोकरदन येथील निवडणूक रंगतदार ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात राज्यसभेचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या आमदार कन्या श्रीजया यांचा बालेकिल्ला भोकर येथे नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक उमेदवार उभे आहेत. नांदेड जिल्ह्यात भोकर येथील निवडणुकीकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच १३ नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. हा जिल्हा मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा आहे. लोकसभा निवडणुकीत नांदेड येथे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर भाजपने दोन जणांना राज्यसभेवर घेऊन त्यांना खासदार बनविले. त्यामध्ये अशोक चव्हाण व डॉ. अजित गोपछडे यांचा समावेश आहे. त्यामुळे हे भाजपचे दोन खासदार किती नगराध्यक्ष निवडून आणणार आहेत हे भाजपच्या वरिष्ठांनी त्यांच्याकडून एक परीक्षा म्हणून तपासून घ्यावे, असे नांदेड जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, पैठण, वैजापूर तसेच खुलताबाद व गंगापूर, फुलंब्री नगरपंचायत या ठिकाणी भाजपला किती नगराध्यक्ष निवडून आणता येतील याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार हे सिल्लोड नगरपालिकेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी मैदानात आहेत. त्यांच्या निवडणुकीकडे सर्वच पक्षाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर आहे, तर २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप केले जातील तसेच २ डिसेंबर रोजी मतदान व लगेच दुसऱ्या दिवशी ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


- डॉ. अभयकुमार दांडगे

Comments
Add Comment

कर्माचे प्रतिबिंब

ऋतुराज : ऋतुजा केळकर आज अचानक एका अतिशय वाईट वृत्तीच्या घमेंडी, उद्धट ओळखीच्या व्यक्तीला असाध्य रोग झाल्याचे