दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून बांगलादेशचा संघ (बांगलादेश अ) अंतिम फेरीत पोहोचला. उपांत्य फेरीचा सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला होता. पण भारतीय कर्णधाराने हिरो बनण्यासाठी सुपर ओव्हरमध्ये केलेली चूक टीम इंडियाला भोवली.
भारताला विजयासाठी एका चेंडूंत चार धावांची गरज होती. त्यावेळी भारताच्या हर्ष दुबेने चेंडू फटकावला आणि तीन धावा धावून काढल्या. यामुळे दोन्ही संघांची धावसंख्या २० षटकांच्या अखेरीस १९४ अशी झाली. यामुळे नियमानुसार सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. भारताची सुपर ओव्हरमध्ये पहिली फलंदाजी होती. यावेळी भारताच्या संघात वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या आणि नेहाल वढेरा हे चांगल्या फॉर्मात दिसत होते. त्यामुळे हे तिघे भारताक़डून फलंदाजीला येतील, असे वाटत होते. पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा कर्णधार जितेश शर्मा हा फलंदाजीसाठी आला. जितेशने काहीही विचार न करता स्ट्राइकही घेतली. पहिल्याच चेंडूवर तो स्कुपचा फटका मारण्यासाठी गेला आणि क्लीन बोल्ड झाला. हिरो बनण्याच्या प्रयत्नात कर्णधार जितेश शर्मा झिरो झाला. या विकेटमुळे भारतीय संघ एकदम दबावात आला. नंतर भारताकडून सूर्यवंशी ऐवजी आशुतोषला पाठवण्यात आले. तो झेलबाद झाला. लागोपाठ दोन्ही फलंदाज रिपॉनच्या चेंडूवर बाद झाले. यानंतर बांगलादेशची फलंदाजी सुरू झाली. सुपर ओव्हरमध्ये भारताचा पहिला डाव शून्यावर आटोपला होता. पण बांगलादेशला विजयासाठी आवश्यक एक धाव मिळवताना एक विकेट गमवावी लागली. सुयश शर्माच्या चेंडूवर यासिर अली झेलबाद झाला. रमनदीप सिंहने अत्यंत हुशारीने झेल घेतला. नंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अली मैदानात आला. यानंतर सुयशने गुगली टाकला पण तो लेगला एकदम खाली गेला. पंचांनी 'वाईड' असा निर्णय दिला. जेव्हा चेंडू वाईड गेला त्यावेळी बांगलादेशच्या फलंदाजाला यष्टीचीत करण्याची संधी होती. पण भारतीय यष्टीरक्षकाने चेंडू व्यवस्थित पकडला नाही आणि संधी गमावली. वाईडची धाव मिळाल्यामुळे बांगलादेशचा सुपर ओव्हरमध्ये विजय झाला. या विजयामुळे बांगलादेशचा संघ अंतिम फेरीत पोहोचला.
याआधी नाणेफेक जिंकून भारताने गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करुन वीस षटकांत सहा बाद १९४ धावा केल्या तर भारताने धावांचा पाठलाग करताना वीस षटकांत सहा बाद १९४ धावा केल्या. यानंतर सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपले.