मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर हरकती व सूचना या २८ नोव्हेंबरपासून नोंदवता येणार आहे. विशेष म्हणजे प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर २२७ प्रभागांमधील सर्व मतदारांच्या यादीची छायांकित प्रती उबाठा आणि मनसेच्यावतीने शुल्क भरुन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
या दोनच पक्षांनी मुंबईतील सर्व २२७ प्रभागांच्या मतदार याद्यांच्या खरेदी केल्या होत्या. त्यामुळे उबाठा आणि मनसेने दुबार मते आणि चुकीची नावे समाविष्ठ केल्याचा आरोप केला होता, तसेच मतदार यादीवर दोन्ही पक्षांनी लक्ष ठेवण्याचे आदेश गटप्रमुखांना दिले होते, त्यापार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष काय शोधून काढता की खोदा पहाड, निकला चुहाँ अशी त्यांची अवस्था होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, सन २०१७मध्ये मुंबईत ९१ लाख ८० हजार मतदार होते, पण आता मुंबईत १ कोटी ०३ लाख मतदार आहेत. विशेष म्हणजे दुबार मतदारांची नावे आयोगाने यादीत चिन्हांकित केलेली आहेत.
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना पूर्ण झाल्यानंतर प्रभाग आरक्षणही काढण्यात आले. त्यानुसार, आता प्रारुप प्रभागातील मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक विभागाने मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ करिता १३ नोव्हेंबर रोजी मतदार याद्या तयार करण्याचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार, विधानसभा मतदार यादी २० नोव्हेंबर रोजीपासून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या प्रारूप मतदार यादीवर २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्यासाठी अंतिम दिवस आहे.मुंबईतील २२७ प्रभाग निहाय मतदार याद्या महापालिकेच्या https://portal.mcgm.gov.in>> New (नवीन) >> BMC General Election 2025 (बीएमसी जनरल इलेक्शन २०२५ ) >> Prabhag Voter List 2025 >>> Draft Voter List या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारूप मतदार
चुका, त्रुटी अथवा इतर बाबतीत नागरिकांनी त्यांच्या हरकती व सूचना येत्या २७ नोव्हेंबरपर्यंत पालिकेने ठरवून दिलेल्या प्रभाग कार्यालयात अथवा साहाय्यक आयुक्त यांच्याकडे नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. या हरकती व सूचना यांवर निर्णय घेण्यासाठी राज्य निवडणूक विभागाने महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली आहे.
तसेच, प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून त्या ५ डिसेंबर रोजी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. प्राप्त होणा-या हरकती व सुचनांवर लेखनिकांच्या काही चुका, दुस-या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले, तसेच संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे वगळण्यात आली असल्यास अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करता येणार आहे. मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास अशा सुधारणात तथा दुरूस्ती करण्यात येणार आहेत.