कर्माचे प्रतिबिंब

ऋतुराज : ऋतुजा केळकर


आज अचानक एका अतिशय वाईट वृत्तीच्या घमेंडी, उद्धट ओळखीच्या व्यक्तीला असाध्य रोग झाल्याचे कळले आणि “त्यांनी आयुष्यभर जे लोकांकडून शिव्याशाप घेतलेत त्याचा हा परिणाम आता मोठा पशात्ताप होतोय” असे जेव्हा सांगणारी माझी मैत्रीण म्हणाली. तेव्हा मग,


पापांचे ओझे पाठीवरती,
तरीही चालतो अभिमानाने...
दुःखाचे कारण शोधत नाही,
जगतो फक्त तक्रारीतून...
एक क्षण थांबून पाहिले,
अंतर्मनात डोकावले...
तेव्हा उमगले हे सारे मीच पेरले,
मीच उगमले...


मीच लिहिलेली ही चारोळी आठवली. आपल्या आयुष्यात कितीतरी चुका, पाप, अन्याय आपण नकळत वा जाणूनबुजून केलेले असतात. त्या सर्वांचं ओझं आपल्या पाठीवर आहे, पण तरीही आपण अभिमानाने मिरवतो जणू काही आपण निष्पाप आहोत, निर्दोष आहोत. हीच आपली पहिली चूक असते. आत्मपरीक्षणाऐवजी आत्मप्रशंसेत रमणं. दुःख आलं की आपण त्याचं मूळ शोधण्याऐवजी त्यावर तक्रारींचा पडदा टाकतो. ‘का माझ्याच बाबतीत असं होतं?’ असा प्रश्न विचारतो, पण ‘मी असं का केलं?’ हा प्रश्न टाळतो. ही तक्रारींची सवय आपल्याला सत्यापासून दूर नेत राहते. दुःखाच्या क्षणी आपण त्याच्या उगमाकडे पाहण्याऐवजी, तक्रारींच्या धुक्यात स्वतःलाच हरवून टाकतो. ‘का माझ्याच बाबतीत असं होतं?’ असा प्रश्न विचारतो, पण ‘मी असं का केलं?’ हा प्रश्न टाळतो. ही तक्रारींची सवय आपल्याला सत्यापासून दूर नेत राहते आणि मग जाणवतं हे दुःख कुणी दुसऱ्याने दिलेलं नाही, ते माझ्याच कर्मांचं फळ आहे. जे पेरलं, तेच उगवलं.


ही जाणीवच आत्मबोधाची पहिली पायरी ठरते. दैनंदिन जीवनाच्या ओघात शरीर थकून बसलेलं असतं, मन विस्कळीत विचारांच्या वावटळीत हरवलेलं आणि ‘आत्मा’ तो तर काळाच्या पडद्याआड गूढतेत हरवलेला. व्याधींचा भार जणू काळजाच्या कपारीत खोलवर रुजलेला असतो, पण त्याच्या मुळाचा शोध घेताना आपण बाह्य कारणांचा एक चकवा किंवा जाळं म्हणू या हवे तर ते कायम विणत असतो. तसं पाहायला गेलं तर ‘हवामान, आहार, काळ, नशीब’ हे सारे केवळ दोषारोपाचे मुखवटे आहेत.


पण एक क्षण, जिथे वेळ थांबते आणि मनाच्या शांत किनाऱ्यावर जाणिवेची लाट हलकेच स्पर्शून जाते तिथे, एक निःशब्द प्रकाश झिरपतो आणि त्या प्रकाशात उमगते ती वेदना. बाहेरून आलेली नाही तर ती आतून उगमलेली असते. पूर्वजन्मीच्या कर्मांची सावली आजच्या दुःखाच्या पानांवर उमटलेली आहे, जणू ‘काळाच्या हस्ताक्षरात कोरलेली’. कलियुगाच्या वेगात आता कर्माचा हिशेब पुढच्या जन्मावर न ढकलता, याच जन्मात चुकता केला जातो. म्हणूनच जगण्याच्या प्रत्येक वळणावर आपली कृती आपल्यालाच आरसा दाखवते क्षणोक्षणी, स्पष्टपणे, निःशब्दपणे. ही जाणीव हीच खरी बुद्धीची पहिली पायरी आहे. कारण जेव्हा आपण स्वतःच्या दुःखाचा उगम स्वतःच्या कर्मात पाहतो, तेव्हा आत्मबोधाचा दीप मंदपणे उजळू लागतो.


कर्म म्हणजे केवळ कृती नव्हे तर ती एक सूक्ष्म ऊर्जा आहे, जी काळाच्या सीमारेषा ओलांडून अस्तित्वाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजते. काही कर्म क्षणात फळ देतात, तर काही जन्मांच्या प्रवासात गुढपणे अंकुरतात आणि योग्य क्षणी उगम पावतात. ‘कधी अन्नदान टाळलं जातं, कधी गुरूंचा अवमान होतो आणि कधी, आजच्या जगात, एखाद्याला जाणीवपूर्वक मानसिक छळाच्या गर्तेत ढकललं जातं. शब्दांनी जखम केली जाते, प्रतिष्ठा पायदळी तुडवली जाते आणि माणूस नोकरीच नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वापासूनही दूर जाऊन आत्महत्येसारख्या निर्णयापर्यंत पोहोचतो’. हेही कर्मच आहेत आणि त्यांचाही विपाक अटळ आहे. या कृतींमध्ये केवळ सामाजिक दोष नाही, तर आत्म्याच्या प्रवासातले गडद वळण दडलेले असतात. ज्येष्ठ पुराणांपैकी एक ब्रह्मांड पुराण जे सृष्टी, धर्म आणि कर्मविपाक म्हणजेच केलेल्या प्रत्येक कृतीचा अचूक आणि अटळ परिणाम, जो कधी आशीर्वादासारखा, तर कधी शापासारखा उगवत असतो याचे गूढ उलगडते. त्यात म्हटलं आहे की, प्रत्येक कृती विश्वाच्या एका अदृश्य कोपऱ्यात नोंदली जाते आणि ‘काळाच्या हस्ताक्षरात’ ती आपल्यासमोर उभी ठाकते. आणि आता याचा ‘पश्चाताप’ म्हणजे अगदी साध्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘आत्म्याचं स्नान’ एक निःशब्द झरं, जिथे गढूळपणा विरघळतो आणि शुद्धतेची झुळुक अलगद उसळते. ती केवळ अपराधांची यादी नसते, तर एक अंतर्मुख संधी असते, स्वतःच्या गोंधळलेल्या अस्तित्वाला पुन्हा आकार देण्याची म्हणजेच, विस्मरणात गेलेल्या आत्मभानाला पुन्हा जागवण्याची. जसं गंगाजळीत पाणी शुद्ध होतं, तसंच पश्चाताप मनाच्या खोल तळाशी उतरतो. जिथे शब्द नसतात, पण जाणिवा असतात आणि त्या जाणिवांच्या स्पर्शात, आपण निःशब्दपणे म्हणतो, “जे मी केलं आणि मला त्याचा पश्चाताप आहे.” तोच क्षण जिथे, आत्मा स्वतःच्याच सावल्यांना सामोरा जातो आणि त्या सामर्थ्याने उजळतो. पर्यायाने पश्चाताप म्हणजे दोषांची कबुली नव्हे, तर शुद्धतेची तयारी. तो, ‘अकल्पित पण अतिशय योग्य क्षण’ जिथे आपण स्वतःला पुन्हा एकदा नव्याने पाहतो, नव्याने ओळखतो आणि नव्याने घडवतो.


आज आपण दुःखात आकंठ बुडालो आहोत, पण त्याचं मूळ शोधण्याची जाणीवच हरवली आहे. उलट, नव्या पापांची गुंफण अधिक गडद होत चालली आहे जणू, अंधारात अंधाराची भर. काॅर्पोरेट जगात जाणीवपूर्वक मानसिक छळ आणि राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचा खेळ हेही कर्मच आहेत. जेव्हा एखाद्याला खोट्या आरोपांनी बदनाम केलं जातं, जनतेला दिशाभूल केली जाते किंवा सत्तेसाठी सत्य दडपलं जातं तेव्हा केवळ सामाजिक अन्याय होत नाही, तर आत्म्याच्या प्रवासात गडद सावल्या उमटतात. पण यातून मार्ग आहे आत्मचिंतन, पश्चाताप आणि सुधारणा. हे तीन शब्द नाहीत, ते तीन दीप आहेत जे, अंधारात उजेड देतात आणि त्या उजेडात, आपल्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं जसं आहे, तसं. त्या क्षणात, आपण स्वतःला पाहतो दोषांसह, पण सुधारण्याच्या संधीसह.


‘शेवटी, आपण जे पेरतो तेच उगवतं’ हे केवळ तत्त्वज्ञान नाही, तर अनुभवाने सिद्ध झालेलं सत्य आहे. कर्म हे केवळ कृती नव्हे, तर अस्तित्वाच्या गाभ्यात रुजणारी ऊर्जा आहे, जी वेळेच्या ओघात आपल्याला आरशासमोर उभं करत राहते आणि जेव्हा त्या आरशात आपलं प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागतं, तेव्हा आत्मचिंतन, पश्चाताप आणि सुधारणा हे तीन दीप आपल्याला अंधारातून उजेडाकडे घेऊन जातात. त्या उजेडात आपण स्वतःला पाहतो दोषांसह, पण नव्याने घडण्याच्या संधीसह आणि हेच ‘कर्माचे प्रतिबिंब’ जे प्रत्येक वळणावर आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची संधी देतं.

Comments
Add Comment