सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत
मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणी १५ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारच्या एकाही प्रतिनिधीने १५ दिवसांत आपल्याशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आता दादरच्या कबुतरखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा जैन मुनींनी दिला.
मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यामुळे आक्रमक झालेल्या जैन समाजाने जैन मुनी नीलेश चंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली ३ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले. त्यावेळी आझाद मैदानावर जाऊन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन मुनींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही आझाद मैदानावर जैन मुनींची भेट घेण्यासाठी गेले होते. या प्रकरणी १५ दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. त्यानंतर जैन मुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सोडले.
जैन मुनी नीलेश यांनी ३ नोव्हेंबरला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. मुंबईकरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यासाठी पर्यायी जागांचा शोध घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. पालिका प्रशासनाने दोन दिवसांत मुंबईतील चार जागांची निवड करून त्या ठिकाणी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्याची परवानगी दिली. दादरच्या कबुतरखान्याबाबत काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे जैन मुनी नीलेश यांनी सरकारला २० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली असून त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा दिला आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांना धोका निर्माण होणार नाही व कबुतरांचाही जीव वाचेल अशा पद्धतीने तोडगा काढण्याचे आश्वासन नार्वेकर यांनी दिले होते.