मुंबई : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला असून मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरून प्रत्येकी एक लोकल धावणार आहे. यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दिलासा मिळेल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण – सीएसएमटी विशेष लोकल शनिवारी रात्री २.३० वाजता कल्याण येथून सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे पहाटे ४ वाजता पोहोचेल, तर हार्बर मार्गावरील पनवेल – सीएसएमटी विशेष लोकल शनिवारी रात्री २.४० वाजता पनवेल येथून सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे पहाटे ४ वाजता पोहोचेल. या दोन्ही विशेष लोकल धीम्या असून सर्व स्थानकांमध्ये थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. पश्चिम रेल्वेवरील विरार येथून शनिवारी रात्री २.३० वाजता विशेष लोकल सुटेल. ही लोकल चर्चगेट येथे पहाटे ४.१२ वाजता पोहचेल. ही लोकल धीम्या मार्गावर धावणार असून सर्व स्थानकात थांबा घेतील, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.