कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात दहशत माजवणाऱ्या व दोन जिवांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात आले. शनिवारी मध्यरात्री धारणगाव शिवारात वन विभागाच्या पथकाने त्याला गोळ्या घातल्याची माहिती सहायक उपवनरक्षक गणेश मिसळ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांनी दिली.
गेल्या आठवड्यात तीन वर्षांची नंदिनी चव्हाण आणि नंतर शांताबाई निकोले या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू या बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता. सलग हल्ल्यांमुळे संतापलेल्या नागरिकांनी दोनदा रास्ता रोको करत प्रशासनावर दबाव आणला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिबट्याला ठार मारण्यास परवानगी दिली. पुण्यातून बोलावण्यात आलेल्या दोन शूटरांनी ही कारवाई केली.
नाशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी संपूर्ण बंदोबस्त उभारला होता. वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि रेस्क्यू टीमने सलग अनेक दिवस मेहनत घेऊन ऑपरेशन यशस्वी केले. या कार्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
तथापि, परिसरात इतर काही बिबट्यांमुळे अजूनही पशुधनावर हल्ले होत असल्याने त्यांच्याही बंदोबस्ताची मागणी आता जोर धरत आहे.
दरम्यान, अहमदनगर शहराजवळील निंबळक शिवारात लहान मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलावर हल्ला करणाऱ्या दुसऱ्या बिबट्याच्या संदर्भातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाव बंद ठेवावे लागले होते, तर नागरिकांनी रास्ता रोको करत या बिबट्याला ठार करण्याची मागणी केली होती. विविध पथकांचे प्रयत्न, पिंजरे लावूनही हा बिबट्या सतत चकवत असल्याने जिल्हा उपवनसंरक्षकांनी त्याला ठार मारण्याचा प्रस्ताव मुख्य वन्यजीव रक्षक विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला रात्री मंजुरी मिळाली असून आदेश ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.