पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मिळालेल्या विजयामुळे सरकार स्थापनेची हालचाल वेगाने सुरू झाली आहे.
बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपत असल्याने, त्यापूर्वीच प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांमध्येही मंत्रिमंडळ वाटप आणि पुढील धोरणांवर विचारमंथन सुरू असल्याचं समजतं.
विधानसभेच्या निवडणुकीत एनडीएने अभूतपूर्व यश मिळवत २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवला. भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष झाला तर जेडीयूने ८५ जागा जिंकल्या. लोक जनशक्ती पक्षाने १९, हिंदुस्थानी अवाम मोर्चाने पाच आणि राष्ट्रीय लोक मोर्चाने चार जागांवर विजय मिळवला.
महागठबंधनमधील आरजेडीने २५, काँग्रेसने सहा, सीपीआयएमएलएलने दोन, सीपीआयएम आणि आयआयपीने प्रत्येकी एक जागा जिंकली.
बीएसपीने एक तर एमआयएमने ५ जागांवर विजय मिळवला. नव्या कॅबिनेटमध्ये भाजपचं प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदासाठी नितीशकुमार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. नव्या मंत्रिमंडळात जेडीयूचे १४ आणि भाजपचे १६ मंत्री असतील तसेच भाजपकडे अनेक महत्त्वाची खाती असतील, असे समजते.