फलटण : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी उडाली असून अनेक ठिकाणी नवी समीकरणे, नवी आघाड्या आणि जुन्या वादाच्या नव्या अध्यायांना सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिकेत मात्र पारंपरिक राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय हालचालींमुळे फलटणमध्ये पुन्हा एकदा ‘रामराजे नाईक निंबाळकर’ विरुद्ध ‘रणजितसिंह नाईक निंबाळकर’ अशी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी अर्ज दाखल केले असून ते धनुष्यबाण चिन्हावर रिंगणात उतरतील. विशेष म्हणजे, रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्या चिरंजीवांनी शिवसेनेची बाजू सांभाळली आहे.
दुसरीकडे, भाजपाने शेवटच्या क्षणी मोठा राजकीय ट्विस्ट देत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. मागील काही दिवसांपासून दिलीपसिंह भोसले यांच्या नावाची चर्चा होती; मात्र अंतिम क्षणी समीकरण बदलत भाजपाने समशेरसिंह यांच्यावर विश्वास ठेवला.
या घडामोडींमुळे फलटणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा थेट मुकाबला ठरणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजकीय वर्चस्वाची चुरस स्थानिक पातळीवर अनुभवायला मिळणार आहे. फलटणची निवडणूक त्यामुळे अधिकच लक्षवेधी बनली आहे.