आळंदी : संत परंपरेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या आळंदीत आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी उसळली. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरून आलेले वारकरी लांबलचक रांगेत उभे राहत आहेत. समाधी परिसरात अखंड कीर्तन-भजनाचा नाद घुमत असून संपूर्ण वातावरण भक्तिभावाने न्हाऊन निघाले आहे.
परंपरेनुसार इ.स. 1296 साली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीस्वरूपात प्रवेश केल, ज्याला संजीवन समाधी म्हणून ओळखले जाते. संत परंपरेतील हा टप्पा अत्यंत पवित्र मानला जातो. आज अलंकापुरीतील समाधीस्थळ पहाटेपासूनच भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.
गर्दीचा अंदाज ओळखत आळंदी नगरपालिका आणि मंदिर समितीने परिसरातील सुरक्षेबरोबरच स्वच्छतेची व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा, रांगेचे व्यवस्थापन आणि प्राथमिक वैद्यकीय सेवा याचीही खास तयारी करण्यात आली आहे.