सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी नक्षलवादी ठार झाले. चकमक भेज्जी और चिंतागुफा या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जंगलात झाली. जंगलात डोंगराळ भागात कारीगुंडमजवळ चकमक झाली.
गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीआधारे सापळा रचून डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड अर्थात डीआरजीने नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली. सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन माओवादी नक्षलवादी ठार झाले. एसीएम दर्जाचे नक्षलवादी चकमकीत मारले गेले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
छत्तीसगडमध्ये यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये आतापर्यंत २६२ नक्षलवादी ठार झाले आहेत. ठार झालेले बहुसंख्य नक्षलवादी हे बस्तर विभागातील आहेत. बस्तर विभागातच सुकमा येते. ताज्या चकमकीची माहिती देताना एसपी किरण चव्हाण यांनी सुरक्षा पथकातील जवानांचे कौतुक केले. चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा पथकाचील सर्व सदस्य सुरक्षित आहेत, असेही ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याची घोषणा केली आहे. देशात ठिकठिकाणी नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. शरण या नाहीतर सुरक्षा पथकाच्या कारवाईला सामोरे जा असा इशारा अमित शाह यांनी दिला आहे. यानंतर अनेक नक्षवद्यांनी शरणागती स्वीकारली आहे. उर्वरित नक्षलवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे.