छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना वेग आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्याने उभारलेल्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना हा दौरा महत्त्वाचा ठरला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “बिहारमध्ये जनतेने पुन्हा मोदींवर विश्वास ठेवत विरोधकांच्या प्रयत्नांवर पाणी सोडले. हा विजय भारतीय जनता पक्षाच्या सतत वाढत असलेल्या शक्तीचा पुरावा आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला जनता आता बळी पडत नाही,” असं ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर राज्यातील येणाऱ्या निवडणुकांतही विरोधकांना अशीच स्थिती अनुभवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपच्या संघटनात्मक बळकटीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून पक्षाने संघटनेची मुळे घट्ट रोवण्यासाठी काम केले. पुढे २०१४ नंतर देशभरात प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या मोहिमेचा एक भाग म्हणून संभाजीनगरातील हे कार्यालय कार्यान्वित होत आहे.
फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील अनेक प्रलंबित प्रकल्पांना गती दिली गेली असून पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून ८०० कोटींचा भार उचलला गेलाय. “आम्ही मंजूर केलेल्या योजनेला मागच्या सत्तेने अडथळे आणले. पण आमच्या सरकारने ती योजना मार्गी लावून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा मार्ग मोकळा केला आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
औद्योगिक गुंतवणुकीवर बोलताना फडणवीसांनी सांगितले की छत्रपती संभाजीनगर देशातील “इलेक्ट्रिक वाहन राजधानी” म्हणून पुढे येत आहे. नवीन उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
समृद्धी महामार्ग, सिंचन प्रकल्प आणि नदीजोड योजना या निर्णयांमुळे मराठवाड्याचा चेहरामोहरा बदलत असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, “जनतेला कोण काम करतंय हे कळतं, कोणाकडे काय आहे आणि काय नाही हेही माहित असतं.” शेवटी कार्यकर्त्यांना आवाहन करत फडणवीस म्हणाले की, “प्रत्येक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवणं हेच आपलं ध्येय आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजप राज्यात सर्वात मजबूत पक्ष ठरेल.”