मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. यानंतर भाजपचे मिशन मुंबई लगेच सुरू झाले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ पैकी २०२ जागांवर एनडीएचा विजय झाला. या २०२ पैकी ८९ जागा भाजपने, ८५ जागा जेडीयूने, १९ एलजेपीने, ५ हमने आणि ४ जागा राष्ट्रीय लोकमोर्चाने जिंकल्या आहेत. बिहारमधील विजयानंतर आता मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी भाजपने कंबर कसून तयारी केली आहे.
मुंबईत उद्धव समर्थकाने ठिकठिकाणी बॅनरल लावले. 'ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक' अशी ओळ या बॅनरवर आहे. या बॅनरवर उद्ध ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांचे मोठे फोटो आहेत. या बॅनरला उत्तर म्हणून मुंबई भाजपने ठिकठिकाणी त्यांचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर 'परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक, तोच नगरसेवक' अशी ओळ आहे.
महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक कधी होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. पण मुंबईसह राज्यातील शहरांमध्ये महापालिकांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप करणारी वक्तव्ये करणे, बॅनरबाजी करणे असे प्रकार सुरू झाले आहेत. मुंबईत उद्धव समर्थक आणि भाजप यांनी एकमेकांविरोधात केलेली बॅनरबाजी सध्या चर्चेत आहे.
विशेष म्हणजे बिहारचा निकाल जाहीर होऊन २४ तास होत नाहीत तोच मुंबईचा महापौर कोण होणार असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुंबईत महायुतीचा महापौर होईल, मुंबईकर महायुतीवरच विश्वास दाखवतील; असे मुख्यमंत्री म्हणाले. यामुळे भाजपचे मिशन मुंबई सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नगरपालिका : २४६
नगरपंचायती : ४२
एकूण जागा : ६,८५९
अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबर
अर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंत
मतदान : २ डिसेंबर
मतमोजणी : ३ डिसेंबर
विभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायती
कोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती : ४५, नागपूर : ५५