नागपूर : विदर्भाने पुन्हा एकदा राज्यात आपली ताकद दाखवत गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्रातील १३ सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील विद्यापीठांच्या कामकाजाचे स्वतंत्र मूल्यमापन केले असून, कोणत्याही विद्यापीठाकडून माहिती किंवा अर्ज मागविण्यात आले नव्हते. विद्यापीठांनी शासनाकडे वर्षभरात सादर केलेल्या नोंदींच्या आधारे हे मूल्यमापन करण्यात आले. अर्न्स्ट अँड यंग या संस्थेची मदत या प्रक्रियेसाठी घेण्यात आली.
या तपासणीत विद्यापीठांचे प्रशासकीय कामकाज, सेवाशर्ती, विविध संवर्गांच्या ज्येष्ठतासूची, पदोन्नती आणि सरळसेवा नियुक्त्या, अनुकंपा नियुक्ती, रिक्त जागांची स्थिती, बिंदुनामावलीचे प्रमाणीकरण, आयजीओटी पोर्टलवरील नोंदणी आणि अभ्यासक्रम पूर्णता, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक डिजिटल व अद्ययावत ठेवणे अशा एकूण १०० गुणांच्या निकषांवर विद्यापीठांची चाचणी करण्यात आली.
या सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत गोंडवाना विद्यापीठाने ६८ गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला. मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी प्रत्येकी ६६ गुण मिळवत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सांगितले की, वर्षभर सातत्याने प्रक्रिया अद्ययावत ठेवून, प्रशासनिक कामांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे विद्यापीठाला ही कामगिरी साधता आली.
राज्यातील विद्यापीठांचे गुण असे:
गोंडवाना विद्यापीठ – ६८
मुंबई विद्यापीठ – ६६
शिवाजी विद्यापीठ – ६६
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – ६२
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ – ६०
एसएनटीडी महिला विद्यापीठ – ५७
सोलापूर विद्यापीठ – ५४
कालिदास संस्कृत विद्यापीठ – ५२
नागपूर विद्यापीठ – ५२
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विद्यापीठ – ५०
नांदेड विद्यापीठ – ४८
जळगाव विद्यापीठ – ४८
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – ४२