मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या तब्येतीत पुन्हा बिघाड दिसून आला. गेल्या तीन दिवसांपासून ते सतत अस्वस्थ असून, मथुरा परिसरात काढल्या जाणाऱ्या यात्रेदरम्यान त्यांना ताप, कमी रक्तदाब आणि श्वास घेण्यास होणारा त्रास यांचा सामना करावा लागत आहे. प्रकृती ढासळल्याने एका ठिकाणी त्यांनी रस्त्यालगत आडवे होऊन विश्रांतीही घेतली. उपस्थितांनी टॉवेलने हवा करून त्यांना आराम मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, धीरेंद्र शास्त्री यांच्या फुफ्फुसात धुळीमुळे इन्फेक्शन झाल्यामुळे श्वसनाचा त्रास होत आहे. डॉक्टरांनी मास्क वापरण्याची सूचना केली असतानाही त्यांनी ते टाळले. पदयात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांची तब्येत ठीक नसून, भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून त्यांनी कोणतीही औषधे न घेता यात्रा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलाय आहे. सध्या त्यांना सुमारे 100°F ताप आहे आणि रक्तदाबही कमी आहे. अनवाणी चालत असल्यामुळे आणखी त्रास जाणवत आहे, असे त्यांच्यासोबत असलेले उत्तर प्रदेशचे नेते राजा भैया यांनी सांगितले.
प्रकृती ढासळलेली असतानाही धीरेंद्र शास्त्री यांनी विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. कोसी कला येथे बोलताना त्यांनी रामनाम, वंदे मातरम किंवा जय श्री राम या घोषणांबद्दल ज्यांना अडचण आहे त्यांनी लाहोरची तिकिटे काढावीत, असे कठोर विधान केले. अशा लोकांकडे तिकीटासाठी पैसे नसतील तर कर्ज घेऊन तिकिटे काढून देण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. ते मुस्लिम समाजाविरोधात नाहीत; परंतु देशविघातक प्रवृत्तींच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही हिंदू विरोध करत असतील तर त्यांनी स्वतःची डीएनए तपासणी करून घ्यावी, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पूर्वी केलेल्या एका वक्तव्यात, काही दंगलखोर आणि कट्टरवादी गटांचे ‘शिक्षण’ देशात बॉम्बस्फोट घडवण्यापुरते मर्यादित असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याऐवजी अब्दुल कलाम यांच्यासारखे आदर्श व्यक्तिमत्व होण्यासाठी मुस्लिम समाजाने शिक्षण धोरणात बदल करावा, अशीही त्यांनी मांडणी केली होती.
धीरेंद्र शास्त्री यांची एकूण ५५ किलोमीटरची ही पदयात्रा १६ नोव्हेंबरला संपणार आहे. गुरुवारी त्यांनी मथुरा सीमारेषा पार करत दिल्ली-हरियाणा मार्गे पुन्हा उत्तर प्रदेशात प्रवेश केला.