मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद वस्तूमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) जवळ बस डेपो परिसरात एक लाल रंगाची बेवारस बॅग आढळल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. काही क्षणातच पोलीस कर्मचारी आणि बीडीडीएस पथकाने परिसर सील करत तपासणी केली.
बॅगेत नेमकं काय सापडलं?
तपासणीदरम्यान बॉम्ब शोधक पथकाने बॅग काळजीपूर्वक उघडली असता, त्यात फक्त कपडे, टॉवेल, काही वह्या व पुस्तकं आणि काही कागदपत्रे आढळली. स्फोटक पदार्थ किंवा कोणतीही धोकादायक सामग्री सापडली नसल्याची खात्री मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी परिसर पुन्हा सामान्य लोकांसाठी खुला केला. दोन तासांहून अधिक काळ तणावात असलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बीडीडीएस पथकाचे अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले की, प्राथमिक प्रतिसाद म्हणून ही तपासणी करण्यात आली. "घटनास्थळी पोहोचताच आम्ही बॅगची सुरक्षितपणे तपासणी केली. परंतु बागेत कोणताही घातक पदार्थ नव्हता," असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सुरुवातीच्या अहवालात आलेल्या काही तफावतींची पोलिसांकडून पडताळणी केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटानंतर, मुंबई पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. गेटवे ऑफ इंडिया, हाजी अली, मरीन ड्राइव्ह, सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर तसेच प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकांवर बॅगा, वाहनांची तपासणी आणि CCTV च्या माध्यमातून सतत देखरेख सुरू आहे. प्रवाशांची हालचाल सुरळीत असली तरी सुरक्षा दलांची उपस्थिती पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढलेली दिसत आहे.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा हालचाल ताबडतोब १०० क्रमांकावर कळवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल मीडियावर कोणत्याही अप्रमाणित माहितीचे प्रसारण टाळावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.