बालदिन हा केवळ मुलांचा उत्सव नाही, तर तो देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा सण आहे. कारण आजची मुलेच उद्याचा भारत घडवतात. या दिवशी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध आणि भाषण स्पर्धा, खेळ आणि मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित केले जातात. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी सर्वजण एकत्र येऊन या दिवसाचे महत्त्व समजावून सांगतात.
बालदिनावरील भाषण
सर्वांना माझा नमस्कार. आज आपण एक विशेष दिवस साजरा करत आहोत, १४ नोव्हेंबर, म्हणजेच बालदिन! हा दिवस आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. नेहरूंना मुलांवर अतूट प्रेम होते. त्यांचे मत होते की मुले ही देशाची खरी शक्ती आणि भविष्य आहेत. त्यांनी नेहमीच म्हटले की मुले फुलांसारखी असतात, निरागस, सुंदर आणि सतेज.
बालदिन हा आनंद, खेळ आणि शिकण्याचा दिवस आहे. या निमित्ताने आपण मुलांच्या हक्कांबद्दल विचार करतो, शिक्षणाचा हक्क, पोषण, आरोग्य, खेळ आणि सुरक्षितता यांचा अधिकार प्रत्येक मुलाला मिळायलाच हवा. बालपण ही आयुष्यातील सर्वात सुंदर वेळ असते, आणि ती प्रत्येकासाठी सुरक्षित व आनंदी असावी, हीच खरी या दिवसाची भावना आहे.
चाचा नेहरूंचे स्वप्न होते की भारतातील प्रत्येक मूल शिक्षित, जबाबदार आणि दयाळू नागरिक बनावे. त्यामुळे आपणही या बालदिनी एक वचन देऊया, की आपण मुलांना फक्त चांगले शिक्षणच नाही, तर प्रेम, प्रोत्साहन आणि योग्य वातावरण देऊ.
अभ्यास केवळ गुणांसाठी नव्हे तर ज्ञानासाठी, खेळ केवळ आनंदासाठी नव्हे तर एकतेसाठी, आणि स्वप्ने केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजाच्या प्रगतीसाठी पाहिली पाहिजेत. प्रत्येक मुलामध्ये एक उज्ज्वल किरण दडलेला असतो त्या किरणाला प्रोत्साहन देणे हीच आपली जबाबदारी आहे.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!