नवी दिल्ली: रेड फोर्टजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामागे कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी कथित संबंध असलेल्या “डॉक्टर टेरर मॉड्यूल” च्या संदर्भात एकूण पंधरा व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या १५ जणांना अटक केली असून, आतापर्यंत ५६ डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे.
या मॉड्यूलचा तपास श्रीनगरमधील एका आक्षेपार्ह पोस्टर प्रकरणापासून सुरू झाला, ज्यात सुरक्षा दलांना धमक्या देण्यात आल्या होत्या. चौकशीच्या पहिल्या टप्प्यात शोपियाँमधील मौलवी इरफान अहमद वाघ आणि गांदरबलमधील जमीर अहमद यांना अटक करण्यात आली. यानंतर ५ नोव्हेंबरला सहारनपूरमधून डॉ. आदिलला अटक करण्यात आली.
या तपासादरम्यान फरीदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटी दहशतवादी मॉड्यूलचे ऑपरेशनल केंद्र असल्याचे उघड झाले. डॉ. मुजम्मिलला अटक केल्यानंतर २,५६३ किलो स्फोटके अल फलाह मशिदीचे इमाम हाफिज मोहम्मद इश्तियाक यांच्या घरातून जप्त करण्यात आली. एकूण सुमारे ३,००० किलो स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, “या कारवाई दरम्यान, अल फलाह युनिव्हर्सिटीचा कर्मचारी आणि कथित मॉड्यूल सदस्य डॉ. उमर मोहम्मद भूमिगत झाला.”
१० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात डॉ. उमर मोहम्मदचा कापलेला हात आढळला असून, तो आत्मघाती हल्लेखोर असल्याचा संशय आहे. या पुष्टीकरणासाठी त्याच्या आईच्या डीएनए नमुन्यांची तपासणी केली जात आहे. स्फोटातील कार डॉ. शाहीन शाहीद हिच्या नावाने नोंदणीकृत होती, ज्याना नंतर लखनऊमधून अटक करण्यात आली. जैश-ए-मोहम्मदच्या भारतातील कारवायांची प्रमुख म्हणून तिची ओळख पटली आहे.
डॉ. निसार-उल-हसन कुठे आहे?
दिल्ली स्फोटाच्या चौकशीत फरीदाबादच्या अल-फलाह मेडिकल कॉलेजमधील वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. निसार-उल-हसन याचे नाव समोर आले, जेव्हा एनआयएने विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू केली. काश्मिरी वंशाचे हे डॉक्टर पूर्वी श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक होते. जिथे त्याला २०२३ मध्ये देशविरोधी कारवायांच्या संशयावरून काढून टाकण्यात आले होते. दिल्ली स्फोटानंतर निसार अचानक गायब झाला, ज्यामुळे जैश मॉड्यूलशी त्याचे संबंध असल्याचा संशय निर्माण झाला. तपास संस्था विद्यापीठ कॅम्पसमध्ये असतानाचे त्याचे फोन रेकॉर्ड, ईमेल आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, ज्यामुळे उमर आणि मुझम्मिल सारख्या अटक केलेल्या संशयितांशी त्याचे संबंध असल्याचे सिद्ध होत आहे. बेपत्ता निसारचा सध्या देशभर शोध सुरू आहे.
पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची छापेमारी
पुण्यातील कोंढवा भागात दहशतवादी विरोधी पथकाने छापेमारी केल आहे. यावेळी एका व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे. या व्यक्तीला अद्याप ताब्यात घेतलेले नाही, मात्र त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत लॅपटॉप, हार्डडिस्क आणि काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहेत अशा माहितीही समोर आली आहे. दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली आहे. संशयित व्यक्तीकडून जप्त करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतर या व्यक्तीचा नेमका कुठल्या व्यक्तीशी आहे हे समोर येणार आहे.
आय २० कारनंतर इकोस्पोर्ट कारच्या शोधात पोलीस
दिल्ली स्फोटाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठा सुगावा हाती लागला आहे. संशयित दहशतवाद्यांकडे केवळ आय २० कार नव्हती आणखी एक गाडी होती. ही माहिती मिळाल्यानंतर दिल्लीतले सगळे पोलीस ठाणे, पोलीस चौक्या आणि बॉर्डर चेकपॉईंट्सना सतर्क करण्यात आले आहे.
या इकोस्पोर्ट गाडीचा क्रमांक DL१०CK०४५८ असा असल्याचे सांगितले जात असून उमर उन बनी याच्या नावावर ही गाडी आहे. राजौरी गार्डन आरटीओकडून या गाडीची नोंदणी २२ नोव्हेंबर २०१७ ची असल्याचे सांगितले. दिल्ली पोलिसांनी सर्व पथकांना सांगून लाल रंगाच्या इकोस्पोर्ट कारचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. या कारचा शोध घेण्यासाठी आता पाच टीम वेगवेगळ्या भागांमध्ये तपास करीत आहेत. सोबत उत्तर प्रदेश, हरियाणा पोलिसांनाही अलर्ट करण्यात आले आहे. परिसरातल्या टोलनाक्यांवरही याबाबतची माहिती दिलेली आहे. यासह फिरत्या पथकांना सशस्त्र राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
एटीएसची इब्राहिम आबिदी यांच्या मुंब्रा अन् कुर्ला येथील घरावर धाड
पुण्यातील अल कायदा प्रकरणाचे धागेदोरे आता मुंब्र्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे एटीएसने सॉफ्टवेअर इंजिनिअर जुबेर इलियास याला अटक केल्यानंतर, महाराष्ट्र एटीएसने मुंब्रा आणि कुर्ला येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत इब्राहीम अबिदी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. एटीएसला संशय आहे की, 'हा मुलांना दहशतवादी कृत्यांसाठी प्रवृत्त करत होता'. अबिदीच्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून, त्याचा तपास केला जाणार आहे. ही कारवाई 'अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट' या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार करण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या जुबेर इलियास प्रकरणाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे एटीएसने मुंब्रा कोसा येथे इब्राहिम आबिदी यांच्या घरी छापेमारी केली. मुंब्रा येथील घरी छापेमारी केल्यानंतर आबिदीच्या कुर्ला येथील घरावरही एटीएसने शोधमोहिम केली. मात्र लॉकडाऊननंतर आबिदी याने दुसरे लग्न केले, ते मुंब्रा येथे राहायला गेल्यानंतर या कुटुंबियांशी फारसा संबध ठेवला नसल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाचे धाडसत्र सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. यात शिक्षक असलेल्या इब्राहिम आबिदी यांच्या मुंब्रा आणि कुर्ला येथील घरावर एटीएसने धाड टाकली. यावेळी घरातून मोबाईल, लॅपटॉप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आलीय, तर पुण्यातील जुबैर हंगरगेकर यांच्या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून एटीएसने ही कारवाई केली आहे.
अल-कायदा इन इंडियन सबकाँटिनेंट संघटेंनेचा समर्थक असल्याचा आणि जिहादचा कथित प्रचार केल्याप्रकरणी हंगरगेकरला अटक झाली होती. मात्र इब्राहिम आबिदींच्या कुटुंबियांकडून या आरोपांचा खंडन करत सांगितले की, इब्राहिम आबिदी मदरश्यात उर्दू शिकवत नसून साबू सिद्दीकी महाविद्यालय ३५ वर्षापासून प्राध्यापक असल्याची कुटुंबीयांनी माहिती दिली.
लेडी डॉक्टर शाहीनबाबत मोठे खुलासे!
जैश-ए-मोहम्मदच्या फरिदाबाद मॉड्यूलच्या दहशतवादी निधीची आता एजन्सी चौकशी करत आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, लेडी डॉक्टर शाहीनला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून निधी मिळत होता. जैश-ए-मोहम्मदच्या इशाऱ्यावर, शाहीन पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी महिला शाखेसाठी भरती केंद्रे उघडण्यात सहभागी झाली होती.
शाहीनला जैश-ए-मोहम्मदकडून मिनी रिक्रूट-कमांड सेंटरसाठी निधी मिळाला. शहराच्या बाहेरील भागात आणि कमी मानवी हालचाली असलेल्या या मिनी रिक्रूट-कमांड सेंटरसाठी शाहीन सहारनपूर आणि हापूरमध्ये ठिकाणे शोधत होती. तपास यंत्रणांना संशय आहे की, शाहीननेच जैश-ए-मोहम्मदच्या या मॉड्यूलला दहशतवादी निधी पुरवला होता.
शाहीन, आदिल, उमर आणि मुझम्मिल यांच्या खात्यांची तपासणी केली जात आहे. शाहीनच्या खात्यात परदेशी निधीचेही संकेत सापडले आहेत आणि त्याबाबत शाहीनची सतत चौकशी केली जात आहे. शिवाय, मौलवी इरफान अहमद हा जैशच्या एका कमांडरच्या संपर्कात होता आणि त्याला जैशकडून निधी मिळत होता. शाहीन मदरसे आणि इरफान जकातच्या नावाखाली गरीब मुस्लिम मुली आणि महिलांसाठी निधी गोळा करत होती. तपास यंत्रणांना संशय आहे की, याचा वापर स्फोटके आणि गुप्तहेरांसाठी केला जात होता. शाहीन अझहर मसूदची बहीण सहिदा अझहर हिच्याशी थेट संपर्कात होती.