Monday, December 8, 2025

समाजदायित्वाची तेजस्विनी वाटचाल

समाजदायित्वाची तेजस्विनी वाटचाल

कर्तृत्ववान ती राज्ञी : डॉ. जयश्री कुलकर्णी

वैशाली गायकवाड

नमस्कार मैत्रिणींनो ! २०२५ या वर्षात सुरू झालेल्या या लेखमालेचे आजचे हे ४६ वे पुष्प. विद्यार्थिनी असल्यापासूनच समाजकार्याचा वसा घेतलेल्या विद्यार्थी परिषद कार्यकर्त्या, लेखिका, स्त्रीशक्ती संशोधिका, प्राध्यापिका डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्या सर्जनशील प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

पुण्यनगरीत एका सुशिक्षित आणि संस्कारवेलींनी नटलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात जयश्रीताईंचा जन्म झाला. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाण या त्रिवेणीने सजलेले घर त्यांना लाभले. सहा भावंडांमध्ये वाढत असताना शिकण्याची ओढ आणि समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी लहानपणापासूनच त्यांच्यात दिसत होती.

बारावीनंतर त्यांनी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तेथे विद्यार्थिनी म्हणूनच नव्हे, तर नेत्रदीपक नेतृत्वगुणांनी सजलेली युवती म्हणून ओळख निर्माण केली. एफ. वाय. मध्येच त्यांच्या कवितेला ज्येष्ठ कवी वसंत बापट यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले. महाविद्यालयीन मासिक ‘मिसेलनी’च्या संपादक मंडळावर, वादविवाद मंडळाच्या सचिवपदी आणि भित्तिपत्रक संपादनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. विद्यार्थी परिषदेच्या कार्यातून त्यांची सामाजिक वाटचाल सुरू झाली. गरीब विद्यार्थ्यांसाठी “पंडित मदन मोहन मालवीय पुस्तक पेढी” फक्त एका रुपयात पुस्तकांचा संच देण्याच्या विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमात तसेच सुट्टीतील रोजगार योजना, यात त्यांनी मनापासून सहभाग दिला. स्वतःच्या कल्पकतेमधून वसाहतीत मुलांसाठी अभ्यासिका सुरु केली तसेच परिषद कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी सामाजिक प्रश्नावर आधारित ‘दृष्टी’ भित्तिपत्रक सुरू केले. त्या काळात गाजलेले 'मीनाक्षीपुरमचे धर्मांतर' या विषयावर परिसंवाद आयोजित करून नागरिकांमध्ये संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण केली. हे उपक्रम खूपच लोकप्रिय झाले.

१९८३ मध्ये 'आसाम बचाव' आंदोलनात गुहाटी येथे जाऊन त्यांनी सत्याग्रहात सहभाग घेतला. देशभक्तीची ही ज्योत त्यांच्या संपूर्ण कार्यात तेजाळत राहिली. नाशिक येथे विद्यार्थी परिषद शहर संघटन मंत्री म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांविषयी जागरूक केले. केळकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून अध्यापनास सुरुवात केली. नंतर ठरवून वनवासी भागामध्ये राहायचे आणि महिलांवरती काम करायचे या उद्देशाने शहापूर कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. त्याच काळात समविचारी प्राध्यापक विजय कुलकर्णी यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

समाजाप्रित्यर्थ असणारी त्यांची निष्ठा, समर्पित भावनेने काम करण्याचा स्वभाव यामुळे त्यांच्या सासरच्यांचाही त्यांच्या कार्याला भक्कम पाठिंबा मिळाला. प्रसिद्ध विचारवंत आणि लेखिका कै. दुर्गाबाई भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याच्या प्रेरणेने त्यांनी वनवासी महिलांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास सुरू केला. केळकर कॉलेजमधील नोकरी सांभाळत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेमध्ये ग्रंथालयात त्या अध्ययन करत असत. तसेच सुनंदाताई पटवर्धन यांच्या सोबत जव्हार, मोखाडा, तलासरी येथे प्रत्यक्ष जाऊन तेथील महिलांशी संवाद साधण्याचे भाग्यही त्यांना मिळाले.

त्या दरम्यान दोन जुळ्या मुलींना सांभाळून त्यांची नोकरी, समाजकार्य हे अविरत चालूच होते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांनी आपली सपोर्ट सिस्टीम तयार केली, तर उत्तम वाटचाल करता येत असल्याचे जयश्रीताई सांगतात. केळकर, बेडेकर, पोदार, एन.के.टी. अशा नामांकित महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून सेवा बजावताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण रुजवली. जाहिरात विषयात नवे प्रयोग, सामाजिक प्रकल्प आणि पथनाट्य यांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेचा जागर फुलविला.

२०१४ मध्ये त्यांनी “शहापूर तालुक्यातील वनवासी महिलांचे बचत गट” या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. “परिषदेच्या लेकी” हे संपादित पुस्तक त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे प्रतीक ठरले. लातूर येथे झालेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याने अनेक विद्यार्थिनी कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली..त्यांचे ३५ पेक्षा अधिक संशोधनपर लेख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर झाले असून २०१५ मध्ये पॅरिस येथील परिषदेत शोधनिबंध सादर करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारने प्रायोजित केले होते..

‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’ या बेघर मुलींच्या पुनर्वसन संस्थेच्या ठाणे येथे चालणाऱ्या केंद्रात प्रमुख म्हणून त्यांचे कार्य आजही सुरू आहे. बेघर मुलींना शिक्षण देऊन, त्यांचे जीवन सुरक्षित करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना स्वावलंबी बनवण्याचं पवित्र कार्य या संस्थेमार्फत जयश्री कुलकर्णी करत आहेत. ‘तेजस्विनी महिला संमेलन’ यशस्वीपणे पार पाडण्यात मोलाचा वाटा दिला, तसेच ज्येष्ठ व आदर्श समाजसेविका सुनंदाताई पटवर्धन यांच्या जीवनावर “वनवासींच्या वहिनी” हा चरित्रग्रंथ लिहून प्रकाशित केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांनी व्याख्याने दिली, स्त्रीशक्ती आणि सामाजिक परिवर्तनाचे संदेश दिले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून “कर्तृत्ववान राज्ञी” या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. महिलांनी पैसा, प्रसिद्धी, मानमरातब याच्यामागे न लागता स्वत्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता यशस्वी वाटचाल करणाऱ्या जयश्री कुलकर्णी यांचे कार्य हे सगळ्यांसाठीच अत्यंत प्रेरणादायी असे आहे. Vaishu.gaikwad78@gmail.com

Comments
Add Comment