Tuesday, July 21, 2026

गावाची थोरवी

गावाची थोरवी

फेरफटका-सीमा मालाणी माझा एक मित्र धार्मिक आहे. त्याने 'गो-सेवा' म्हणून एक गाय पाळली आहे. शिवाय गावठी गाईचे दूध खूपच श्रेष्ठ असते असे त्याचे मत आहे. धार्मिक विधीत वेळोवेळी लागणाऱ्या शेण- गोमूत्राबद्दल त्याला आस्था असल्याने तो गो-सेवा मनापासून करतो. बऱ्यापैकी रहदारी असलेल्या रस्त्यावर त्याचे जमिनीवर घर आहे. घराला लागून रस्त्यावरच त्याने एक छोटेसे तारेचे कंपाउंड(गोठा) केले आहे. रस्ता ओलांडून समोरच रांगेने मोठी झाडे आहेत, त्यापैकी एका झाडाच्या सावलीतही एक छोटा तारेचा गोठा त्याने केला आहे व तिथेही बदल म्हणून तो गाईला ठेवतो. घर लहान म्हणून गाईला स्वतंत्र गोठा नाही. सरकारी रस्त्याचीच थोडीशी जागा 'ढापून' त्याची गोसेवा सुरू आहे.

एकदा आम्ही मित्र-मैत्रिणी गप्पा मारायला गोळा झालो होतो तेव्हा तो मित्र थोडा व्यथित दिसला. कारण विचारताच म्हणाला,“अरे सध्या पितृपक्ष चालू असल्याने दरवर्षीप्रमाणे आमच्या राणीची (गाईचे नाव) तब्येत बिघडली आहे. ती नुसती बसून राहते, जडत्व आल्यासारखी. कदाचित् मला डॉक्टरांना बोलावून तिला इंजेक्शन द्यावे लागेल.” आमचे प्रश्नांकित चेहरे पाहून पुढे म्हणाला,“माझी गाय माझ्या दारात बांधलेली असते. पितृपक्षात लोक कावळ्याला संपूर्ण नैवेद्याच्या ताटाचा घास घालतात, पण जर कावळ्याने घास घेतला नाही तर ते ताट तसेच गाई पुढे ठेवतात. दररोज हिरवा चारा खाऊन कंटाळलेली गाय 'फॉर ए चेंज' म्हणून ताट साफ करते. असे आठ-दहा दिवस खाल्ल्यानंतर ती सुद्धा कंटाळून ताटातले पदार्थ खात नाही व ते अन्न तसेच पडून राहते. त्यावर माशा घोंगावतात. रोज तळलेल्या पुऱ्या, खीर, भजी, मसालेभात वगैरे खाऊन गाय सुस्तावते व बसून राहते. हिरवा चारा न खाल्ल्याने बहुतेक पोट साफ होत नाही व ती आजारी पडते. अशी ही गाईची दुःखद कहाणी त्याने आम्हाला सांगितल्यावर आम्हाला देखील वाईटच वाटले. यावर काय बरे उपाय करता येईल याचा जो तो विचार करू लागला.

माझ्या डोळ्यांपुढे तर अनेक चित्रे येऊन गेली. गाय केवढी मोठी, कावळा तो केवढा? शंभर कावळ्यांची पंगत बसेल इतके मोठे ताट वाढून कावळ्यांना देणे म्हणजे बहुतेक १०० पूर्वजांना जेऊ घालणे. मग त्या आधीच्या पूर्वजांचे काय? त्यांना उपाशीच ठेवायचे? माझ्या नवऱ्याने मला एकदा सांगितले की ,"अगं, माझे एक चुलत आजोबा विडी फुंकायचे. तर दरवर्षी पितृपक्षात त्यांना म्हणजेच कावळ्यासाठी घास काढलेल्या पत्रावळीत एक विडी पण ठेवायचे. त्यावेळी विडी फुंकणाऱ्या कावळ्याला म्हणजेच आजोबांना आम्ही लहानपणी नमस्कार करायचो. मग माझ्याही डोळ्यांपुढे चारमिनार ओढणारा कावळा, तंबाखू खाणारा, पान खाऊन पिचकारी मारणारा किंवा चोचीला मशेरी लावणारा, काचेच्या ग्लासाच्या कडेवर बसून बियर पिणारा कावळा असे अनेक कावळे येऊन गेले.

आमच्याकडे राहायला एकदा आमची अमेरिकेत असलेली भाची, तिचा नवरा व पाच-सहा वर्षांचा त्यांचा मुलगा अर्णव आले होते. तिचा मुलगा पहिल्यांदाच भारतात येत होता. आमचं घर आनंदाने भरून गेलं. एकदा सकाळी दहा-अकराच्या सुमारास आम्ही सर्वजण जरा पायी फिरून येऊ म्हणून घराबाहेर पडलो. शिवाय अर्णवला आपलं गाव दाखवूयात असाही विचार होता. तो भिरभिर इकडे तिकडे पाहू लागला आणि रस्त्यातच एकदम स्तब्ध उभा राहिला व जोरात ओरडला, "मम्मा इज िधस झू?" सुरुवातीला आम्ही सगळेच दचकलो. मग लगेच लक्षात आले की आजूबाजूला रस्त्यात अनेक प्राणी म्हणजेच कुत्री, गाई, गाढवं, डुकरं, मांजरी... रोजच्याप्रमाणे मुक्तपणे हिंडत होते. अर्णवसाठी ते अगदीच नवे असल्याने तो एकटक त्या प्राण्यांकडे पहात होता. त्याला खूपच आनंद झाला होता व तो हाताने टाळ्या पिटीत आम्हाला ते प्राणी दाखवत होता. आम्हीही त्याच्या आनंदात सामील झालो म्हटलं, "पोरगं भारताचा केवढा आनंद घेतंय " असं करत करत आम्ही त्याला घेऊन पुढे जात असताना एका मोठ्या झाडाखाली एक म्हैस बसलेली दिसली. नेहमीप्रमाणे मालक म्हशीला बांधून जवळच कुठेतरी गेला असावा. "बफेलो ऑल्सो... व्वाव... कॅन आय टच मम्मा" आम्ही म्हटलं ,"हो हो चल थोडे पुढे जवळ जाऊन हात लाव हळूच." अर्णवने हळूच तिच्या पाठीवरून हात फिरवला. म्हशीला काहीच कळले नाही, तिची तंद्री लागलेली होती. ती शेपटीने एक सारख्या पाठीवरच्या माशा उडवत होती. मी अर्णवला म्हणाले,"अर्णव शी इज सेईंग हॅलो टू यु विथ हर शेपूट अँड चूइंग हर फुड लाईक च्युईंगम." अर्णव एकदम खूश. उत्साहात मला शेपूटला, टेल हा शब्द आठवला नाही पण अर्णवला माझं इंग्लिश कळलं. मग त्याच्या बाबाने म्हशीबरोबर त्याचा एक फोटो घेतला. घरी येऊन अर्णवने लगेच रस्त्यावरच्या झूचं एक चित्र काढलं. त्याच्या अमेरिकन मित्रांना दाखवण्यासाठी. अर्थात आमच्या दृष्टीने ते चित्र अमूर्त शैलीतील होतं. पण त्याने त्याच्या आई-बाबांना त्या चित्रातील गाय, कुत्रा, गाढव, म्हैस वगैरे सगळं समजावून ते नीट ठेवायला सांगितलं.

त्याचे नाना म्हणजे माझा नवरा, त्याला टू-व्हीलरवर नेतो व फिरवून आणतो असं बोलल्यावर अर्णवचा बाबा एकदम टेन्स झाला. कारण आपल्याकडील ट्रॅफिकबद्दल त्याला चांगलंच ठाऊक होतं. कुठलेही नियम न पाळणारे आपलं ट्रॅफिक... त्याच्या एकुलत्या एक मुलाला काही झालं तर? पण नाना म्हणाला ,"नका काळजी करू, गावात सगळ्यात "स्लो" चालवणारा बहुधा मीच आहे, आणतो त्याला जपून." अर्णव नाना बरोबर फिरून आला. जाम खूश होता. माणसांच्या व वाहनांच्या झूमधून फिरण्याचा पहिलाच अनुभव होता.

आमच्या कॉलनीतून बाहेर पडलं की समोरच एक भलं मोठं ग्राउंड आहे. त्या प्रचंड जागेचा वाद कोर्टात चालू आहे. पण सध्या तरी मुलं तिथे क्रिकेट खेळणे, चार-चाकी व दुचाकी शिकणे, ज्येष्ठ लोक, मॉर्निंग वॉक करणे किंवा गप्पांचा अड्डा रंगविणे, काही लहान मुले सायकल शिकणे वगैरे गोष्टींसाठी उपयोग करतात. अंधार पडल्यावर दारूड्या लोकांसाठी एकदम सेफ जागा आहे ती. राजकारणी लोकांना जेव्हा मोठ्या सभा किंवा कार्यक्रम घ्यायचे असतात किंवा कुणा बुवा-बाबांच्या पदस्पर्शासाठी लोक जमा होणार असतात किंवा एखादा मोठा सेलिब्रिटी येणार असतो तेव्हा ते मैदान एकदम चकाचक साफ केले जाते. एरवी मात्र कुठे गवत, कुठे चिखल, कुठे क्रिकेटचं पिच तर कुठे दारूच्या बाटल्यांचा खच... अशी अवस्था असते.

पावसाळ्यात मोठा पाऊस पडून गेला की चिखली रंगाच्या पाण्याचा सुंदर तलाव तयार होतो. होय... सुंदरच म्हणायचं. पांढरीशुभ्र बदक किंवा राजहंस नाही दिसले तरी डेंग्यू, चिकनगुनिया, फ्ल्यू यासाठीचे डास असतातच की तिथे. डोळ्यांना दिसत नाही इतकंच. कधी कधी मोठ्ठे आवाजी कार्यक्रम असतात तेव्हा आनंदाने आमच्या खिडक्यांची तावदानं थरथरतात पण आमची हृदयं भीतीने धडधडतात. क्रिकेटच्या मॅचेस असल्या की पाच सहा तास लाऊडस्पीकर वर जोरात बोलणारा कॉमेंटीटर आमच्या मेंदूचा भुगा करतो पण आम्ही अजून जिवंत आहोत हे काय कमी आहे? आपल्या गावाची, देशची थोरवी सांगू तेवढी कमीच.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा