मुंबई : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. स्थानिक पातळीवर निर्णयांचे अधिकार सर्वच राजकीय पक्षांनी दिल्याने सोयीच्या आघाड्या वा समीकरणे जुळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढविल्या जाणार नाहीत.
कोविड संकटामुळे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील.
नगरपालिका : २४६
नगरपंचायती : ४२
एकूण जागा : ६,८५९
अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबर
अर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंत
मतदान : २ डिसेंबर
मतमोजणी : ३ डिसेंबर
विभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायती
कोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती : ४५, नागपूर : ५५