मुंबई : बॉलीवूड क्षेत्र गाजवणारा सलमान खान आता लवकरच मराठी सिनेमांमध्येही दिसणार आहे. सलमान खानच्या मराठी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या सर्व चाहते "बॅटल ऑफ गलवान" या त्याच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत. त्यातच सलमान खान रितेश देशमुखच्या "राजा शिवाजी" या सिनेमात दिसणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
अभिनेता सलमान खान चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात विश्वासू सहाय्यक अत्यंत धाडसी आणि निष्ठावंत योद्धा जीव महाला यांची भूमिका साकारणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे या सिनेमात चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राईज असेल ते म्हणजे महाराजांचा सर्वात मोठा शत्रू अफजलखानाच्या भूमिकेत अभिनेता संजय दत्त दिसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान ७ नोव्हेंबर पासून "राजा शिवाजी" मधील त्याच्या भूमिकेचे शूटिंग सुरु करणार आहे. हा सिक्वेन्स चित्रपटातील सर्वात भव्य सीनपैकी एक असणार आहे, शिवाय ही भूमिका सुद्धा या कथेत महत्वाची आहे.
जीवा महाला नक्की कोण होते?
अफजल खानच्या विश्वासू सय्यद बंडच्या भयंकर हल्ल्यात शूर आणि वीर जीवा महाला यांनी महाराजांचा जीव वाचवला होता. तेव्हापासून "होता जिवा म्हणून वाचला शिवा" असं बोललंही जातं. आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
रितेश देशमुखने या आधी "वेड" आणि "लय भारी" या मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते.
तर सलमान खानच्या "बॅटल ऑफ गलवान" या सिनेमाचे काम चालू असून, तो २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय "बजरंगी भाईजान २" चे ही काम सुरु झाले आहे.