मुंबई : एरवी सप्टेंबर - ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडणे थांबते. पण यंदा नोव्हेंबर महिना आला तरी राज्यातच नाही तर देशातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शेतीचं आणि पशुधनाचं नुकसान झालं आहे. राज्यात आणखी किमान तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
महाराष्ट्रात किमान तीन दिवस हलक्या ते माध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. हा पाऊस पडत असताना ठिकठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. पुणे, सांगली, सातारा येथे ढगाळ वातावरण असेल. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मोंथा चक्रीवादळांनंतर आणखी एका वादळाचा फटका बसणार असल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असेल; असे हवामान विभागाने सांगितले.
हवामान विभागाचा इशारा
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच देशातील हवामानात मोठा बदल होत आहे. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे देशाच्या अनेक भागात पाऊस आणि वादळे येऊ शकतात. तसेच ८ नोव्हेंबर पर्यंत उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
रत्नागिरी, सांगली, सातारा, अहिल्यानगर, पुणे या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल. बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, ठाणे, रायगड, जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याचे संकेत वर्तवले जात आहेत, यादरम्यान वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे.
८ नोव्हेंबर पर्यंत संकेत आहे
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवारपासून सक्रिय झालेल्या पश्चिमी विक्षोभाचा उत्तर प्रदेशवर सौम्य परिणाम होऊ शकतो. बहुतेक ठिकाणी पावसाची अपेक्षा नाही. मध्य आणि पश्चिम भारतात हवामान बदल दिसून येत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्व मध्य प्रदेशात वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात 5 ते 6 नोव्हेंबर दरम्यान वादळ येण्याची शक्यता आहे.