पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने ठार मारले आहे. या नरभक्षक बिबट्याने तब्बल तिघांचा जीव घेतल्यानंतर परिसरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला आता काहीसा विराम मिळाला आहे.
गेल्या २० दिवसांत या बिबट्याने सलग तीन जणांचा बळी घेतला होता. १२ ऑक्टोबर रोजी सहा वर्षांची शिवन्या बोंबे, २२ ऑक्टोबर रोजी ७० वर्षांच्या भागुबाई जाधव आणि २ नोव्हेंबर रोजी १३ वर्षांचा रोहन बोंबे हे तिघेही त्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. या घटनांनंतर परिसरात संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले, तसेच ३ नोव्हेंबर रोजी तब्बल १८ तासांसाठी महामार्ग रोखून धरला. आंदोलकांनी संतापाच्या भरात वनविभागाचे गस्ती वाहन आणि स्थानिक बेस कॅम्पला आग लावली होती.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्या परवानगीने बिबट्याला पकडणे किंवा ठार मारण्याचे आदेश दिले. या मोहिमेसाठी रेस्क्यू संस्था पुणे येथील पशुवैद्य डॉ. सात्विक पाठव, तसेच शार्प शूटर प्रसाद दाभोळकर आणि जुबिन पोस्टवला यांची नेमणूक करण्यात आली.
पथकाने कॅमेरा ट्रॅप, ठसे निरीक्षण आणि थर्मल ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. अखेर रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याचा मागोवा घेतल्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला, मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर चवताळलेल्या बिबट्याने पथकावर हल्ला केला, तेव्हा शार्प शूटरने अचूक नेम साधत त्याला ठार केले. प्राथमिक तपासानुसार हा सुमारे पाच ते सहा वर्षांचा नर बिबट असल्याचे स्पष्ट झाले आहे.