मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, कर्नाटकमधील बंजारा समाजाला दिलासा
मुंबई : हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात ६० मोर्चे काढण्यात आले होते, त्या आंदोलनांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे यासाठी एक स्वतंत्र आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नाने मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस यांनी आयोगाची घोषणा केली. यावेळी राज्यभरातील बंजारा समाजाच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते.
मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत धर्मगुरू बाबुसिंग महाराज, कॅबिनेट मंत्री संजय राठोड, मंत्री इंद्रनील नाईक, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, आमदार तुषार राठोड, राजेश राठोड, माझी खासदार हरिभाऊ राठोड,निलय नाईक, गोर सेना प्रमुख संदेश चव्हाण, श्रावण चव्हाण, पत्रकार कविराज चव्हाण, उपोषणकर्ते विजय चव्हाण, विनोद आडे यांच्यासह प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बंजारा समाजाचे आम्हाला वेळोवेळी पाठींबा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बंजारा समाजाच्यावतीने हैद्राबाद गॅझेटनुसार एसटी आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे आंदोलने करण्यात येत आहे. त्यांच्या या मागणीचा विचार करत आम्ही एक स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून संबधित विभागाने निवडणूक आयोगाची परवानगी घेत प्रक्रिया सुरू करावी. वसंतराव नाईक महामंडळाला अव्वल दर्जाचा अधिकारी देणार असून बंजारा समाजाच्या आरक्षणात होणारी घुसखोरी थांबविणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात राहणाऱ्या कर्नाटकमधील बंजारा समाजाला जातीचे दाखले उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी इतर मागासवर्गीय विभागाला दिले.