जळगावच्या चोरीचे धागेदोरे उल्हासनगरपर्यंत; सोनार आणि दोघांना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील बंगल्यावर झालेल्या धाडसी चोरीचा थरार अखेर उघड झाला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, चोरट्यांनी पळवलेला सुमारे ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र, या चोरीतील सर्वात महत्त्वाच्या वस्तू असलेल्या 'सीडी', पेन ड्राईव्ह आणि कागदपत्रे यांचा तपास अजूनही सुरू आहे.
गेल्या मंगळवारी ही चोरी झाली होती. खडसे कुटुंबीय मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे वास्तव्यास असल्यामुळे जळगावमधील शिवराम नगर परिसरातील त्यांचा बंगला बहुतांश वेळा रिकामा होता. हीच संधी साधून चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि थेट एकनाथ खडसे तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या खोल्यांमध्ये प्रवेश केला.
चोरट्यांनी कपाटे उघडून त्यातील ६७ ग्रॅम सोने, ७.५ किलो चांदी, ३५ हजार रुपये रोख रक्कम तसेच सीडी, पेन ड्राईव्ह आणि काही महत्त्वाची कागदपत्रे असा ऐवज चोरून नेला होता.
चोरीच्या तपासाचे 'उल्हासनगर' कनेक्शन
चोरी उघडकीस येताच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा, जळगावमधील नातेवाईकांकडे आलेल्या उल्हासनगरमधील तिघांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात जियाउद्दीन शेख (जळगाव) याने मुख्य चोरट्यांना मदत केल्याचे समोर आले आणि त्याला आधी अटक करण्यात आली.
तपासाचा पुढचा टप्पा म्हणून, पोलिसांनी चोरीचा ऐवज कल्याणमधील एका सोनाराकडे विक्री झाल्याची माहिती मिळवली. पोलिसांनी तातडीने चिराग इकबाल सैयद (२२, उल्हासनगर) याला ताब्यात घेतले. चिरागनेच हा संपूर्ण मुद्देमाल कल्याणमधील सराफ व्यावसायिक कैलास खंडेलवाल याला विकल्याची कबुली दिली.
पोलिसांनी सोनार खंडेलवाल याच्याकडून सोने (लगड, रिंग, कर्णफुले, कडे, साखळी) आणि चांदीची गणेश मूर्ती असा सव्वा सहा लाखांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी चिराग सय्यद आणि सोनार कैलास खंडेलवाल या दोघांनाही अटक केली आहे.
चोरलेली 'सीडी' नेमकी आहे कुठे?
या चोरीत ६७ ग्रॅम सोने, साडेसात किलो चांदी मिळाली असली तरी, चोरट्यांनी पळवलेली 'सीडी', पेन ड्राईव्ह आणि महत्त्वाची कागदपत्रे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाहीत. या 'सीडी'मध्ये नेमके काय आहे, ज्यामुळे ती मौल्यवान दागदागिन्यांसोबत चोरली गेली, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन मुख्य आरोपी - मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी आणि बाबा (सर्व रा. उल्हासनगर) हे सराईत गुन्हेगार असून, ते अद्याप फरार आहेत. या तिघांवर मुंबई व गुजरात राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत २० हून अधिक घरफोडी व चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले आहे.
रामानंदनगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके त्यांच्या मागावर आहेत.