निवडणुकीत तृतीयपंथीयांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना, तृतीयपंथीयांची मागणी
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तृतीयपंथी घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, अशी ठाम मागणी मैत्री संघटना, सर्व तृतीयपंथी समुदाय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.
मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, शिवानी गजबर, अमृत आळवेकर, तसेच तृतीयपंथी समाजाचे ज्येष्ठ गुरू शिवाजीराव आळवेकर यांनी यावेळी सांगितले की, राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देऊन उमेदवारी द्यावी, अन्यथा तृतीयपंथी समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास सक्षम आहे. या समाजामध्ये केवळ प्रतिनिधित्वाची पात्रता नाही, तर जनतेशी जोडून राहण्याची व त्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्याची खरी राजकीय क्षमता आहे, हे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
तृतीयपंथी समुदायाने या वर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. "महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राज्य असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेला कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच वंचित घटकांच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे या समाजालाही समान प्रतिनिधित्व देऊन, राजकीय प्रक्रियेत सामील करून घेणे ही काळाची गरज आहे," असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
इतिहासाची नोंद घेत, सन १९६५ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवदासी व तृतीयपंथी समाजातील बाळू चौगुले यांनी निवडणूक लढवली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली. तब्बल अनेक दशकांनंतर पुन्हा एकदा तृतीयपंथी समाज राजकारणात नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत असून, कोल्हापूरकरांनी या समाजाला पाठिबा देऊन सामाजिक न्यायाचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले. या पत्रकार परिषदेला समाजातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते.