प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना मोक्याच्या ठिकाणी घरे

एमएमआरडीए ९८.५५ कोटी रुपये खर्च करणार


मुंबई  : वरळी- शिवडी उन्नत मार्गाअंतर्गंत बांधण्यात येत असलेल्या प्रभादेवी पुलामुळे बाधित होणाऱ्या ८३ कुटुंबांना आता म्हाडाची परळ, प्रभादेवी आणि माटुंगा परिसरात घरे देण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) जवळपास ९८.५५ कोटी रुपये खर्चून ही घरखरेदी करणार आहे. मात्र याच प्रकल्पाच्या आजूबाजूला असलेल्या प्रभादेवी परिसरातील उर्वरित १७ चाळींच्या क्लस्टर विकासाचा प्रश्न अद्यापही
कायम आहे.


सूत्रांनुसार, एमएमआरडीएने यासाठी सुरुवातीला कुर्ला येथील कमानी भागात घरे देण्याचे ठरविले होते. मात्र आता ही घरे महापालिकेच्या जी-उत्तर, एफ-उत्तर व एफ-दक्षिण वॉर्डांच्या भागात देण्याचे ठरले आहे. ज्यांची विद्यमान घरे ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत, त्यांना आता ३५ टक्के वाढीनुसार ४०५ चौरस फूट क्षेत्रफळाची घरे मिळतील. ज्या प्रकल्पग्रस्तांची घरे ३०० ते १२९२ चौरस फूट क्षेत्रफळादरम्यान आहेत, त्यांना ३५ टक्के वाढीव क्षेत्रफळाची घरे मिळतील. पुढील दोन ते तीन आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.


या प्रकल्पासाठी एल्फिन्स्टन पूल पाडकाम सुरू झाले आहे. सध्या पुलाचा मुख्य रस्ता खोदण्यात आला आहे. रेल्वेची मंजुरी मिळताच प्रत्यक्ष पाडकाम सुरू होणार आहे. यानंतर दोन वर्षांत त्या ठिकाणी नवा पूल उभा होईल. त्यातील पहिल्या पुलावरून प्रभादेवी-परळ ये-जा करता येईल तर, त्याचा वरचा पूल वरळी-शिवडी जोडणारा असेल.


उर्वरित १७ चाळींचा प्रश्न कायम


हा प्रकल्प सुरुवातीला एल्फिन्स्टन पुलाच्या बाजूने जाणार होता. मात्र त्यासाठी परिसरातील १९ चाळी पाडाव्या लागणार होत्या व त्याचा पुनर्वसन खर्च पाच हजार २०० कोटी रुपये होता. त्यामुळे एमएमआरडीएने आरेखनात बदल करून केवळ दोन चाळी पाडण्याचे ठरविले. मात्र उर्वरित सर्व १७ चाळीही जुन्या झाल्या असल्याने त्या सर्वांनीच आंदोलनादरम्यान या प्रकल्पाच्या बांधकामावेळी धक्के बसून अपघाताची भीती व्यक्त केली. त्यामुळे उर्वरित १७ चाळींचा क्लस्टरद्वारे विकास करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र हा विकासाचे काम कुठल्या सरकारी संस्थेला द्यायचे, हे ठरत नसल्याने नगरविकास विभागाने याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. परिणामी, १७ चाळींमधील नागरिक निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बेस्ट भरती करणार ५०० वाहक

मुंबई : दिवसेंदिवस कमी होत चाललेली कर्मचाऱ्यांची संख्या व सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर येणारा अतिरिक्त ताण

आयआयटी मुंबईत पहिल्या वर्षासाठी मानसिक आरोग्य अभ्यासक्रम अनिवार्य

मानसिक आरोग्यावर आधारीत अभ्यासक्रम लावणारा मुंबई आयआयटी पहिलाच मुंबई : आयआयटी मुंबईने आपल्या पहिल्या वर्षातील

वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे १९-२० डिसेंबरला मुंबईत आयोजन

जगभरातील अग्रणी उद्योगपती, व्यावसायिक आणि विचारवंत यांना एकत्र आणणारे व्यासपीठ मुंबई : वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक

अंधेरी एमआयडीसीमध्ये रासायनिक गळती

एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर मुंबई : अंधेरी (पूर्व) येथील एमआयडीसी परिसरातील भंगारवाडी येथे शनिवारी

शीळफाटा येथे उड्डाणपुलाच्या कामानिमित्त निळजे-दातिवलीदरम्यान ब्लॉक

मुंबई : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन प्रकल्पासाठी शीळ फाटा येथील उड्डाणपूल हटविण्याच्या कामासाठी,