मुंबई (सचिन धानजी) : वांद्रे पश्चिम येथील एस व्ही रोड आणि के.सी मार्गावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या वारंवारच्या प्रकाराला आता आळा घातला जाणार असून या मार्गावरील तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा त्वरीत होण्यासाठी महापालिकेच्यावतीने याचा शोध घेवू त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येत आहे. याठिकाणचे पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या पर्जन्य जलवाहिनी या मोडकळीस असल्याने तसेच काही वाहिन्या अस्तित्वातच नसल्याने अशा मिसिंग लिंकचा शोध घेवून कामाला सुरुवात केल्याने या भागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या कायमचीच निकालात निघाली जाणार आहे.
वांद्रे पश्चिम भागातील एस व्ही रोड आणि के सी रोड येथे पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात पाणी साचून राहत असल्याने स्थानिकांसह लोकप्रतिनिधीकडून वारंवार तक्रारी येत असल्याने महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये पर्जन्य जलवाहिनी या मोडकळीस आलेल्या असल्यामुळे तसेच काही ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्या अस्तित्वात नसल्यामुळे या ठिकाणच्या पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी पावसाचे पाणी साचत आहे. तसेच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी अस्तित्वात असलेली यंत्रणा अपुरी असल्यामुळे जलवाहिन्यांची रुंदी ही १.२ मीटर एवढी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार पर्जन्य जलवाहिची क्षमता वाढवण्याच्यादृष्टीकोनातून हाती कामे घेण्याकरता निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी ११.२३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या कामांसाठी
नरेंद्र एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन पावसाळ्यात पाणी साचण्याच्या प्रकाराला आळा बसेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.