पुणे : रविवारी पहाटे बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने मेट्रो प्रकल्पाच्या खांबाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जबरदस्त होती की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात ऋत्विक उर्फ ओम विनायक भंडारी (२३, रा. पिंपरी), यश प्रसाद भंडारी (२३, रा. थेरगाव, पिंपरी) आणि खुशवंत किशोर टेकवानी (१९, रा. बीड) या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. ऋत्विक आणि यश यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या खुशवंतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही रविवारी पहाटे कारने प्रवास करत होते.
चालक ऋत्विक भंडारी याचे नियंत्रण सुटल्याने कार थेट मेट्रोच्या खांबावर जाऊन आदळली. अपघातानंतर घटनास्थळी लष्कर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे, वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव, तसेच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. दोघांचे मृतदेह आणि जखमीला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान खुशवंतचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिस अंमलदार रूपेश पांगारे यांनी फिर्याद दाखल केली असून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज जप्त केले असून अपघाताचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. मृतांपैकी ऋत्विक भंडारी हा एमबीए फायनान्सचा विद्यार्थी होता, यश भंडारी आयटी कंपनीत कार्यरत होता, तर खुशवंत टेकवानी हा पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये बीटेकचं शिक्षण घेत होता. तरुण वयात या तिघांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.