नवी मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ चा अंतिम सामना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. याच सामन्यात प्रतिका रावलच्या जागी आलेल्या शफाली वर्माने अप्रतिम फलंदाजी करत सगळ्यांचे मन जिंकले आहे . आपल्या वनडे करिअरमधील ही सर्वात मोठी खेळी करत शफालीने पुनरागमन केले आहे.
टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली. शेफालीने अवघ्या ७८ चेंडूंमध्ये १११.५४ च्या स्ट्राईक रेटने ८७ धावांची जबरदस्त खेळी साकारली. तिच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार होते.
याआधी बांगलादेश विरुद्धच्या लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात फिल्डिंग करताना भारताची सलामी फलंदाज प्रतिका रावल जखमी झाली, त्यामुळे तिला आजचा अंतिम सामना हा खेळता आला नाही, याच्या आधीच्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तिने शतक ठोकले होते. त्यामुळे तिचं बाहेर जाणं हे टीमसाठी मोठा धक्का होतं. त्या जागी बराच काळ संघाबाहेर राहिलेली तरुण खेळाडू शफाली वर्माला पुन्हा संघात स्थान मिळालं.
पण तिच्यावर पहिल्याच संधीपासून चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता . सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिने फक्त ५ चेंडूंमध्ये १० धाव केल्या, त्यामुळे काही चाहत्यांनी तिच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला पण फायनलमध्ये दमदार खेळी करून तिने सर्वांचीच तोंडे बंद केली आहेत.