पुणे : कोंढवा परिसरात गणेश काळे या रिक्षाचलकाची हत्या करण्यात आली. गणेशवर आधी गोळीबार केला गेला नंतर अतिशय जवळून कोयत्याने वार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आणि शस्त्रसाठा जप्त केला. अमन मेहमबुब शेख (२२), अरबाज पटेल, आणि दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी गणेश काळेच्या हत्येप्रकरणी अटक केली. शिवापूर परिसरातून या चौघांना कोंढवा डी बी पथकाने अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेली दोन पिस्तुले आणि दोन इतर शस्त्र अशी एकूण चार शस्त्र जप्त केली आहेत. अटक केलेल्या चौघांची पोलीस चौकशी करत आहेत. हत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.
गणेश काळे याच्यावर हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर गणेशवर कोयत्याने वार करण्यात आले. गणेशचा मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले की, गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात सहभागी होता. त्यानेच हत्येसाठी पिस्तुले मध्य प्रदेशमधून आणली होती. समीरसोबत आकाश म्हस्के, संगम वाघमारे आणि आबा खोंड होते. या चौघांनी धुळेमार्गे मध्यप्रदेशमधून पिस्तुले आणल्याची माहिती समोर आली होती.
आयुष कोमकरची आदेंकर टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली होती. एवढी कारवाई होऊनही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचे गणेश काळेच्या हत्येतून दिसून आले आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणी तुरूंगात असणाऱ्या समीर काळेचा गणेश काळे हा भाऊ आहे. त्यामुळे या हत्येमागे टोळीयुद्ध आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. गेल्यावर्षी वनराज आंदेकरची हत्या कोमकर टोळीकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली.