कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. बेळगाव आणि सीमाभागात आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच थांबवले, ज्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केले.
कर्नाटक राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांतरचनेनंतर झाली. हा दिवस मराठी भाषिक सीमाभागातील लोक दरवर्षी “काळा दिन” म्हणून पाळतात. बेळगाव, कारवार, निपाणी आणि इतर मराठीबहुल भागांवर कर्नाटकाचे वर्चस्व असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन दरवर्षी केले जाते.
या वर्षीदेखील महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना, युवा समिती आणि महिला आघाडी यांसह अनेक संघटनांनी काळा दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची तयारी केली होती. मात्र या आंदोलनाला जाणाऱ्या कोल्हापुरातील शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच थांबवले.
दरम्यान, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या दोन्ही गटांच्या नेत्यांनाही कर्नाटकात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. खासदार धैर्यशील माने, उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे आणि सुनील मोदी या नेत्यांना सीमाभागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही संजय पवार आणि विजय देवणे यांनी कोगनोळी टोल नाक्यावर पोहोचून आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला.
संजय पवार आणि विजय देवणे यांनी सांगितले की, “कर्नाटक पोलिसांकडून कितीही अडथळे आले तरी आम्ही मराठी माणसांसोबत उभे राहणार. मराठी अस्मितेसाठी लढा सुरूच राहील.”
दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी मराठी भाषक सीमाभागातील बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवून काळा दिन पाळला आहे. गेली ६९ वर्षं मराठी माणसं मूक आंदोलन करत मराठी गावांना महाराष्ट्रात सामावून घेण्याची मागणी करत आहेत.
सीमेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बेळगाव हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.