उत्तर मध्य भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला विश्वास
सचिन धानजी
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसच्या खासदार निवडून आला असल्या तरीही या मतदारसंघातील भाजप आणि शिवसेना महायुतीची ताकद कमी झालेली नाही. त्यामुळे उत्तर पूर्व जिल्ह्यात महायुतीची पूर्ण ताकद असून या जिल्ह्यातील कलिना आणि वांद्रे पूर्व विधानसभेत भाजपचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. या दोन्ही विधानसभेत भाजपचे नगरसेवक निवडून आणले जातीलच. एवढंच नाही तर या जिल्ह्यात भाजपचे एकूण २० ते २२ नगरसेवक निवडून येतील असा विश्वास उत्तर मध्य जिल्ह्याचे नवनिर्वाचित भाजप जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलताना उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष विरेंद्र म्हात्रे सांगतात, राजकारणात यायचे असा कोणताही विचार नव्हता. त्यावेळी आमच्या घरी संघाचे कार्यकर्ते यायचे. त्यात माझा मित्र शाम बोरकर होता. त्याने मला भाजप पक्षात आणलं. त्यानंतर भाजपमध्ये मी सक्रिय काम करू लागलो. पुढे माझ्यावर युवा मोर्चा विधानसभा सचिव तथा मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. पुढे पक्षाचा वॉर्डाचा महामंत्री, वॉर्डाचा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधानसभा सरचिटणीस तथा महामंत्री, जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा अध्यक्ष बनलो. पक्षातील सर्व पदे भूषवताना जे कार्य केले, मी जिल्हा सरचिटणीस असल्याने जिल्हाध्यक्षपदासाठी स्वारस्य दाखवलं,आणि माझ्या नावाचा विचार पक्षानं केला. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमदार आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री ऍड आशिषजी शेलार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचं मी आभार मानतो.
जिल्हाध्यक्ष बनल्यानंतर पक्ष संघटनेत काही बदल करण्याचा अथवा काही कमजोर बाबी आहेत का ते तपासून काही सुधारणा करण्यावर भर राहिल,असे सांगत म्हात्रे म्हणतात, जिल्ह्यात मी महामंत्री असल्याने मला संघटनेच्या सर्व बाबी माहितच आहे. तरीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मतदान निकाल पाहता आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जिथं पक्षाला अधिक मजबूत होण्याची गरज आहे, जनतेपर्यंत तथा मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे, तेथील सुक्ष्मरित्या आढावा घेवून काम सुरु आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा काम करत असतो आणि त्याच्या फक्त पाठिवर कौतुकाची थाप मारण्याची गरज असते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला प्रोत्साहित करण्यासाठी चांगल्या कामासाठी शाबासकी द्यायला हवीय, ती दिली जाईल.
पक्षाच्या वतीने जिल्ह्यात राबवले जाणारे कार्यक्रम, सरकारच्या योजना तसेच शिबिर याबाबतची माहिती देताना विरेंद्र म्हात्रे सांगतात की, या जिल्ह्यात सर्वप्रथमच लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना बँक केवायसी करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे या केवायसीकरता महिलांना मदत करण्यासाठी विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच आयुष्यमान भारतचा लाभ जनतेला मिळावा यासाठीही जिल्ह्यात प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त पक्षाच्यावतीने नमो नेत्र अभियान राबवण्यात आले होते. या जिल्ह्यात ४० प्रभागांमध्ये ४२ ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे १८ ते २० हजार चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.
मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अनुभवाबाबत विचारले असता ते सांगतात, सन २०१४ हा देशातील मोठा बदल होता. जो मतदार काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून मतदान करायचा तो परावर्तीत झाला. आणि देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात स्थापन झाले. हा इतिहास आहे. सर्वाचे अनुमान तेव्हा चुकले होते. मोठ मोठे नेते पडले होते. सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या भाजपाचे आमदार निवडून आले. सन २०१९च्या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून ३०० पार गेलो होतो. भाजपा हा मोठा पक्ष असूनही युतीतील पक्षाने गद्दारी केल्याने मोठा पक्ष असूनही आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं. त्यानंतर सन २०२४ लोकसभा निवडणुकीत संविधान बचावचा नारा देत खोटा प्रचार केला. त्यामुळे मतदार भरकटले गेले. तरीही भाजपाचे सर्वाधिक खासदार निवडून आलेत. या उत्तर पूर्व लोकसभा निवडणुकीत या खोट्या अपप्रचाराचा फटका बसला. पण निवडणुकीनंतर मतदारांनाही यातील खरं काय आणि खोटं काय हे कळून चुकलं. त्यामुळे सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपाला मतदान केलं. या जिल्ह्यात वांद्रे पश्चिममधून ऍड आशिष शेलारजी आणि विलेपार्लेमधून परागजी अळवणी हे निवडून आले. बाकीच्या मतदार संघात मित्रपक्षाला जागा दिल्या दिल्या होत्या. त्यामुळे या जिल्ह्यात भाजपाचे दोन आणि शिवसेनेचे दोन अशाप्रकारे महायुतीचे चार आमदार निवडून आले. तर वांद्रे पूर्व आणि कलिना मतदार संघात उबाठाचे आमदार निवडून आलेते.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्व तयारीबाबत विचारले असता विरेंद्र म्हात्रे सांगतात की, उत्तर मध्य जिल्ह्यात एकूण ४० प्रभाग आहेत. या जिल्ह्यात सन २०१७मध्ये भाजपाचे १० नगरसेवक निवडून आले होते. पण आता काँग्रेसचे जगदीश कुट्टी आणि उबाठा शिवसेनेच्या आकांक्षा शेटे हे दोन माजी नगरसेवक भाजपात आले आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात भाजपाचे २० ते २२ नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. वांद्रे पूर्व आणि कलिना विधानसभेत भाजपाचा सध्या एकही नगरसेवक नाही, हि वास्तुस्थिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या दोन्ही विधानसभेत नगरसेवक निवडून आणून भाजपाचा झेंडा फडकवला जाईल आणि हेच आमचं लक्ष्य असेल. आजवर मित्र पक्षाला या विधानसभेत जागा जायच्या. पण भविष्यात काही जागांवर अर्थात जिथे भाजपासाठी पुरक आणि दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे उमेदवार होते, तिथे पक्ष या जागांसाठी दावा करेल. महायुतीच्या नेत्यांना विश्वासात घेवून वरिष्ठ पातळीवर हा निर्णय घेतला जाईल.
कोण भाऊ एकत्र येतात, किंवा कुणाला सोबत घेवून ते एक़त्रपणे लढतात, यापेक्षा आम्ही विकासाच्या मुद्दयावर आणि केलेल्या कामांच्या आधारे निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्हाला खोटा अपप्रचार करण्याची गरज नाही. आज विरोधकांकडे काम दाखवण्यासारखे काही नाही त्यामुळे तो जातीपाती आणि प्रांतिय वाद निर्माण करणे, मतदार याद्यांच्या माध्यमातून खोटा प्रचार करणे असे धंदे त्यांनी सुरु केले आहेत.
दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे काहीही फरक पडणार नाही. आज त्यांचाच कार्यकर्ता हा संभ्रमात आहे, पण मतदार सुज्ञ आहे. सन २०१९ची विधानसभा निवडणूक एकत्र लढल्यानंतर निवडून आल्यावर कुणी गद्दारी केली हे लोकांना माहित आहे. लोकांना ही फसवणूक आवडलेली नाही. आता ही फसवणूक मतदार यादीद्वारे केली जात आहे. पण याच मतदार याद्यांवर पोलिंग एजंट, नगरसेवक आणि आमदारांचे प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी केली होती. तेव्हा यासर्वांच्या समोरच मतदान झाले होते, मग तेव्हाच हा मुद्दा का नाही निदर्शनास आणून दिला. शेवटी एकच सांगेन ज्यांनी कोविड काळात कफन घोटाळा करून मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केलं, ज्यांनी गरीबांच्या खिचडी वाटपात घोटाळा केला, ते जनतेसमोर कोणत्याही तोंडाने मतदान मागायला जाणार म्हणा.
म्हणून मग मराठी मुददा नाहीतर मतदार यादीकडे बोट दाखवून लोकांची आणि पर्यायाने मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दोन्ही ठाकरे हे जनतेच्या हितासाठी किंवा मराठी माणसांसाठी एकत्र आलेले नाहीत, तर ते राजकीय अस्तित्वासाठी एकत्र आलेले आहेत. आज त्या दोघा ठाकरे बंधूंचे जहाज बुडू लागल्याने ते एकत्र येत आहेत, पण जेव्हा बाळासाहेब हयात होते आणि त्यांची या दोघांनी एकत्र यावे अशी इच्छा होती, तेव्हा का आले नाहीत. तेव्हा जर ते एकत्र आले असते तर बाळासाहेबांनाही समाधान वाटलं असतं. हे दोन्ही भाऊ राजकारणासाठी एकत्र आले आहेत. यात त्यांचा स्वार्थ आहे. ते जनतेसाठी काहीच करू शकत नाही.
खरंतर दोन्ही ठाकरे आणि त्यांच्यासोबत काँग्रेस जरी आली तरी आम्हाला आवडेल. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. पण शक्य नाही. तरीही ते सर्व एकत्र आले तरी आमची पूर्ण ताकदीने लढण्याची तयारी आहे. कारण आम्ही आज सत्तेवर असूनही जनतेची कामे करण्यासाठी रस्त्यावर आहोत आणि विरोधात होतो तेव्हा रस्त्यावर होतो. सत्ता आली म्हणून आमचा कार्यकर्ता, पदाधिकारी हा घरी बसलेला नाही. तो सक्रिय आहे. त्यामुळे महापालिका विसर्जित झाल्यानंतर काही नगरसेवक हे, 'आम्ही नगरसेवक आता नाही आहोत' असे सांगून घरी बसले. पण आमचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे रस्त्यावर उतरुन जनतची कामे करत होती आणि आहेत. त्यामुळे लोकांसाठी हक्काने कामे केली तसंच हक्काने मतंही मागायला आम्ही जावू. कामं न करता आम्ही मतं मागणार नाही, त्यामुळे निवडणूक होवू द्या, त्यात आम्ही काय ते दाखवूच!