एक हजार रुपयांच्या मोबदल्यात ६ वर्षाच्या बालकाला जुंपले कामाला !

जिल्ह्यातील आदिवासी कातकरी मुलांचे बालमजुरीसाठी शोषण आजही सुरुच


पालघर : पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजातील अनेक अल्पवयीन तसेच चिमुकल्या मुलांचे बालमजुरीसाठी शोषण होत असल्याच्या घटना समोर येत असतानाच, केवळ १ हजार रुपयांसाठी ६ वर्षीय चिमुकल्या मुलाला जबरदस्तीने कामावर ठेवल्याचा प्रकार उजेडात आला आहे. श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नाने या प्रकरणातील व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बालमजुरी करणाऱ्या आणखी तीन आदिवासी मुलींची सुटका करण्याबाबत पोलिसात तक्रार झाल्याने, या प्रकरणातही दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गौरापूर येथील ६ वर्षीय मुलगा आणि पालघर तालुक्यातील वडाचापाडा बहाडोली या भागातील १२ ते १६ वयोगटातील तीन अल्पवयीन मुलींची बालमजुरीच्या पाशातून मुक्तता करण्यात
आली आहे.


ठाणे जिल्ह्यातील उत्तन (भाईंदर) परिसरात अल्पवयीन कातकरी मुलं आणि मुलींना फसवून त्यांच्या दारिद्र्याचा फायदा घेत त्यांना जबरदस्तीने कामावर ठेवण्याचे प्रकार समोर येत आहेत. वाडा तालुक्यातील गौरापूर कातकरी वाडीतील केवळ सहा वर्षीय कार्तिक ऊर्फ काळू गुरुनाथ वाघ या चिमुकल्याला त्याच्या आजीने प्रवासासाठी घेतलेल्या केवळ १ हजार रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात उत्तन येथील ‘वाणी’ नावाच्या दुकानदाराने जबरदस्तीने कामावर ठेवले होते. हा प्रकार बालकाच्या आजीने श्रमजीवी संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष भरत जाधव आणि सचिव सूरज दळवी यांना सांगितल्यावर उघड झाला.


विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा पोलिस ठाण्यात सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे वाणी नामक दुकानदारावर बंधबिगार उच्चाटन कायदा कलम १६, १७, १८, बालकामगार प्रतिबंधक कायदा कलम १४ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १४६ (बंधबिगार व जबरदस्ती श्रम) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उत्तन सागरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.


तीन अल्पवयीन मुलींची सुटका


पालघर तालुक्यातील बहाडोली वडाचापाडा येथील १२ ते १६ वयोगतील तीन अल्पवयीन कातकरी मुलींना घरकाम आणि मच्छी सुकवण्याचे काम आहे, चांगला पगार मिळेल असे आर्थिक प्रलोभन दाखवून सेलिना आणि आबेल या दोन महिलांनी फसवले. मुलींच्या पालकांना मुलींच्या बदल्यात २ ते ६ हजार रुपये देऊन मुलींना उत्तन-भाईंदर येथे नेण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्याकडून जबरदस्तीने मच्छी सुकवण्याचे आणि मच्छीच्या पाट्या उचलणे आणि घरकामाचे श्रम करून घेतले जात होते. या मुलींना परत पालघर येथे त्यांना घरी येऊ दिले जात नव्हते तसेच संपर्क साधण्यासही मनाई होती. पीडित मुलीच्या वडिलांनी ही बाब श्रमजीवी संघटनेच्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांना सांगितली. त्यानंतर संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, संघटक सचिव सीता घाटाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर तालुका अध्यक्ष उल्हास पाटील व सचिव हिना वनगा, कार्यकर्त्या रेणुका पागी यांनी संबंधित दोन महिलांविरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणातही विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी धाड टाकून आरोपी आबेल आणि मनाली मन्या वाघ या दोघींना ताब्यात घेतले व एका मच्छीमाराच्या घरातून त्या तीन मुलींची सुटका केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments
Add Comment

फुटबॉल मॅचेससाठी घरातून निघाला पालघरात मृतावस्थेत सापडला; मुंबईच्या अंडर-१६ खेळाडूचा रहस्यमय मृत्यू

पालघर : मुंबईजवळील पालघर परिसरात एका फुटबॉल खेळाडूचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ‘पुण्याला

डहाणूत थेट, तर तीन ठिकाणी तिरंगी लढत

महायुतीचे उमेदवार आले आमने-सामने गणेश पाटील पालघर/ वाडा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर

उठाबशा काढायला सांगणाऱ्या शिक्षिकेला शिक्षा!

ममता यादववर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल वसई : उठाबशा काढण्यास सांगितल्यामुळे वसईच्या एका शाळेतील मुलीचा

Vasai News : 'मामा माझ्याशी लग्न कर', भाचीचा तगादा जीवावर! आईच्या सख्ख्या भावासोबतचं अफेअर; लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादाचा भयावह शेवट

मुंबई : वसईतील सातवली परिसरात अपहरण झालेल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली

पालघर नगरपरिषद निवडणुकीत आघाडीत बिघाडी !

महायुतीमध्येही पडली उभी फूट पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यात होणाऱ्या तीन नगरपरिषदेसह एका नगरपंचायत

पालघरमध्ये पक्ष्यांच्या प्रजाती होत आहेत दुर्मीळ

मोखाडा : सूर्याची किरण पडताच पक्षाच्या किलबिलाटाने रमणीय होणारी पहाट आता हरवत चालली आहे. गवताळ डोंगराळ भागात