विरार : वसई - विरार पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याने पालिकेने पॅनलवरील १३ कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या आहेत. तर त्यानंतर नव्याने निविदा प्रक्रिया राबवत आता खड्डे दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ६८ कोटींची तरतूद केली असून याच आठवड्यात रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
वसई - विरार शहरात पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर या खड्ड्यांची संख्या वाढत गेली. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी झाली तरीही पालिका खड्डे बुजविण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता.
महापालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांची डागडुजी करणे, खड्डे बुजविणे यासारखी कामे नियमितपणे करण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने तीन वर्षांच्या कालावधीकरिता पॅनलवर काही कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. त्यांना गणेशोत्सवापूर्वी वसई - विरार शहरातील विविध रस्त्यांच्या डागडुजीची कामे करण्यासोबतच खड्डे बुजविण्याचे काम पॅनलवरील तेरा कंत्राटदारांना देण्यात आले होते. मात्र ते योग्य पद्धतीने न झाल्याने काही महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पालिकेने या संबंधित तेरा कंत्राटदारांना बांधकाम विभागातर्फे नोटिसा देखील बजावल्या आहेत.
या कंत्राटदारांच्या खुलास्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक असल्याने पालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया राबवत खड्डे बुजविण्याचे निर्णय घेतला आहे. ६८ कोटी यासाठी पालिका खर्च करणार असून नव्याने राबवलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या २ दिवसांत यासाठी कार्यादेश देण्यात येणार असून खड्डे बुजविण्यास तत्काळ सुरुवात करण्यात येणार आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले.