मोहित सोमण: जन स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर आज इंट्राडे ओपनिंगला ४% हून अधिक पातळीवर कोसळला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी स्पष्ट केले आहे की, जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने त्यांच्या निकषांची पूर्तता न केल्यामुळे स्वैच्छिकपणे युनिव्हर्सल बँकेत संक्रमणासाठी केलेला अर्ज परत आरबीआयने केला आहे. बेंगळुरू स्थित असलेल्या या बँकेने या वर्षी जूनमध्ये लघु वित्त बँकेतून युनिव्हर्सल बँकेत संक्रमणासाठी अर्ज केला होता. बँकेच्या वाढीसाठी संचालक मंडळाने हा निर्णय घेतला होता. ५ डिसेंबर २०१९ रोजी जारी केलेल्या खाजगी क्षेत्रातील लघु वित्त बँकांच्या 'ऑन टॅप' परवान्यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बँकेने कथितपणे करत २६ एप्रिल २०२४ रोजी लघु वित्त बँकांचे युनिव्हर्सल बँकांमध्ये स्वैच्छिकपणे संक्रमण करण्याबाबत आरबीआयच्या परिपत्रकानुसार हा अर्ज करण्यात आला होता.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, युनिव्हर्सल बँकेत संक्रमण (Transformation) करू इच्छिणाऱ्या लघु वित्त बँकेला गेल्या तिमाहीत किमान १००० कोटी रुपये निव्वळ मूल्य राखणे, गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये निव्वळ नफा असणे, ३% किंवा त्यापेक्षा कमी एकूण एनपीए (Non Performing Assets NPA) म्हणजेच अनुत्पादक मालमत्ता प्रमाण तसेच गेल्या दोन आर्थिक वर्षांत १% किंवा त्यापेक्षा कमी निव्वळ एनपीए प्रमाण असणे आवश्यक असते. मात्र हे प्रमाण राखण्यासाठी बँकेला यश मिळाले नाही.
सप्टेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा (Net Profit ) इयर ऑन इयर बेसिसवर २२.५% ने घसरून ७४.९ कोटी रुपये झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार, निव्वळ एनपीए ०.९४% वर स्थिर होता आणि एकूण एनपीए मागील तिमाहीत २.९१% वरून २.८७% पर्यंत वाढला आहे.निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income NII) ४% वाढून ६१८ कोटी रुपये झाले आहे. कंपनीने मायक्रोफायनान्सवर लक्ष केंद्रित करणारी एनबीएफसी म्हणून सुरुवात केली त्यानंतर परवाना मिळाल्यावर एनबीएफसीचे बँकेत रूपांतर झाले होते. त्यामुळे मार्च २०१८ मध्ये स्मॉल फायनान्स बँक सुरू करण्यात आली.
आता मंजुरी न मिळाल्यामुळे वाढीच्या महत्त्वाकांक्षांवर परिणाम होऊ शकतो आणि जन स्मॉल फायनान्स बँकेचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन सुरू होऊ शकते. नजीकच्या काळात मुख्य एसएफबी ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये, एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडला युनिव्हर्सल बँकेत रूपांतरित होण्यासाठी आरबीआयची तत्वतः मान्यता मिळाली.
माहितीनुसार, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडची मंजुरी प्रलंबित आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौटियाल यांनी अलीकडेच सांगितले की बँक डिसेंबरपर्यंत आरबीआयकडून निर्णय घेण्याची आशा करत आहे. लघु वित्त बँकांनी यापूर्वी मध्यवर्ती बँकेला त्यांच्या नावातून 'स्मॉल' हा शब्द वगळण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती जेणेकरून त्यांना चांगल्या ठेवी जमा करता येतील. तथापि, नियामकाने (Regulator) ही विनंती नाकारली आहे, त्याऐवजी परवाना मार्ग खुला ठेवला आहे असेही प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. सकाळी १०.४० वाजेपर्यंत बँकेचा शेअर १.९६% कोसळत ४४८.५५ रूपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. गेल्या ६ महिन्यात बँकेच्या शेअरमध्ये १३.१८% घसरण झाली आहे. तर वर्षभरात ०.४५% वाढ शेअरने नोंदवली आहे. इयर टू डेट (YTD) मूल्यांकनात मात्र ११.०८% वाढ नोंदवली आहे.