नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले. पॅरालिम्पिक चॅम्पियन प्रमोद भगतने दोन सुवर्णपदके जिंकली, तर सुकांत कदमने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले.
प्रमोद भगतने पुरुष एकेरी एसएल३ प्रकारात सुवर्णपदक जिंकले, अंतिम सामन्यात त्याचा सहकारी खेळाडू मनोज सरकारचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला. त्यानंतर भगतने सुकांत कदमसोबत जोडी करून पुरुष दुहेरी एसएल ३- एसएल ४ चे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने उमेश विक्रम कुमार आणि सूर्यकांत यादव यांचा २१-११, १९-२१, २१-१८ असा पराभव केला.
विजयानंतर भगत म्हणाले, दोन सुवर्णपदके जिंकून मला खूप आनंद झाला आहे. मनोजविरुद्धचा सामना कठीण होता कारण आम्ही दोघेही एकमेकांचा खेळ चांगल्या प्रकारे जाणतो. भारतासाठी ही एक उत्तम कामगिरी आहे.सुकांत कदमने पुरुष एकेरी प्रकारात रौप्य पदक जिंकले, अंतिम फेरीत सूर्यकांत यादवकडून २१-२३, २१-१४, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला.
भारताच्या मानसी जोशीनेही शानदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके जिंकली. तिने महिला एकेरी एसएल३ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि रूथिक रघुपतीसोबत जोडी करून दुहेरी एसएल३-एसयू५ विजेतेपद पटकावले. रूथिकने चिराग बरेथासोबत पुरुष दुहेरी एसयू ५ प्रकारात आणखी एक सुवर्णपदक जिंकले. पुरुष दुहेरीच्या एसएच ६ प्रकारात, शिवराजन सोलाईमलाईने सुवर्ण आणि सुदर्शन मुथुस्वामीने रौप्य पदक जिंकले. यशोधन रावणकोले आणि धीरज सैनी यांनी पुरुष दुहेरीच्या एसयू ५ प्रकारातही सुवर्णपदक जिंकले. महिला एकेरी एसएल ४ + एसयू ५ प्रकारात सरुमतीने ऑस्ट्रेलियाच्या जश्का गुनसनचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.